Manoj Tiwary On Gautam Gambhir: भारतीय मुख्य प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांनी मोठा निर्णय घेतला आहे. आधी यो-यो टेस्टद्वार खेळाडूंची फिटनेस चाचणी घेतली जायची. मात्र ,आता मोठा बदल करण्यात आला आहे. इथून पुढे यो-यो टेस्टऐवजी ब्राँको चाचणी घेतली जाणार आहे. फुटबॉल आणि रग्बीसारख्या खेळांमध्ये खेळाडूंची फिटनेस तपासण्यासाठी ही चाचणी घेतली जाते. आता ब्राँको चाचणी अनिवार्य केल्यानंतर भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर मोठे आरोप केले आहेत. गौतम गंभीरला रोहित शर्मा भारतीय वनडे संघात नको आहे. त्याने २०२७ वर्ल्डकपआधीच रोहितला बाहेर करण्यासाठी ब्राँको चाचणी लागू केली आहे, असा आरोप मनोज तिवारीने केला आहे.
मनोज तिवारी म्हणाला, ” मला तरी हेच वाटतं की, ते विराट कोहलीला वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेच्या प्लॅनमधून बाहेर करू शकत नाहीत. पण मला शंका आहे की, ते रोहित शर्माला या प्लॅनचा भाग ठेवणार नाहीत . कारण, मी क्रिकेटमध्ये काय सुरू आहे, याचा बारकाईने अभ्यास करणारा आहे. काही दिवसांपूर्वी लागू करण्यात आलेली ब्राँको टेस्ट ही रोहित शर्मासारख्या खेळाडूंसाठीच आहे. माझ्या मते, ज्यांना ते भविष्यात संघाचा भाग नको आहेत अशा खेळाडूंसाठी ही टेस्ट आणली गेली आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “ब्राँको चाचणी ही सर्वात कठीण फिटनेस चाचणी ठरणार आहे. पण एकच प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे , आत्ताच का? नव्या मुख्य प्रशिक्षकाला पहिल्या मालिकेपासून जबाबदारी देण्यात आली, तेव्हाच का लागू करण्यात आली नाही? ही कल्पना कोणी दिली? ही चाचणी कोणी आणली? काही दिवसांपूर्वी ब्राँको चाचणी का लागू करण्यात आली नाही? हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. पण माझं निरीक्षण असं सांगतं की, रोहितने आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली नाही, तर मार्ग आणखी खडतर होईल.”
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली. त्याआधी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतही विजय मिळवून दिला होता. मात्र, ही स्पर्धा झाल्यानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. इंग्लंड दौऱ्याआधी त्याने कसोटी क्रिकेटलाही रामराम केलं. त्यामुळे तो आता केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान रोहितला वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा खेळून निवृत्त व्हायचं आहे, असं म्हटलं जात आहे. तर काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेनंतर रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतो.