अर्जेटिनावर मात करून विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या जर्मनीने जवळपास २० वर्षांनंतर पहिल्यांदा फिफा क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने तीन क्रमांकाने बढती घेत दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे. ब्राझीलला नमवून फिफा विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानणारा नेदरलँड्सच्या संघाने १२ स्थानांनी आगेकूच करीत तिसऱ्या स्थानी मुसंडी मारली आहे.
सहा गोल झळकावून ‘गोल्डन बूट’ मिळवणाऱ्या जेम्स रॉड्रिगेझचा कोलंबिया संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. बेल्जियम आणि उरुग्वेने अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान प्राप्त केले आहे. मायदेशातच दारुण पराभव स्वीकारणाऱ्या ब्राझीलची तिसऱ्या स्थानावरून सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. २०१०चा विश्वविजेता स्पेन संघ आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्वित्र्झलड आणि फ्रान्सने अनुक्रमे नववे आणि दहावे स्थान मिळवले आहे. भारतीय संघाच्या क्रमवारीत तीन स्थानाने सुधारणा झाली असून ते १५१व्या स्थानी पोहोचले आहेत.