आगामी ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेऊन केंद्र शासनाने खेळाडू व प्रशिक्षकांकरिता भरघोस सवलती व निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांच्या निधीतही वाढ करण्यात आली आहे.

सबज्युनिअर, ज्युनिअर व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धासाठी विविध राष्ट्रीय संघटनांना अनुक्रमे दोन लाख, चार लाख व सहा लाख रुपयांचा निधी दिला जात असे. हे अनुदान वाढविण्यात आले असून या स्पर्धासाठी अनुक्रमे पाच लाख, सात लाख व दहा लाख रुपांचा निधी दिला जाणार आहे. ‘पाचशेपेक्षा जास्त किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरिता वरिष्ठ गटातील खेळाडू व प्रशिक्षकांकरिता विमान प्रवास खर्च दिला जाणार आहे,’असल्याचे क्रीडामंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी सांगितले. कनिष्ठ गटासाठी १२०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासाकरिता विमान खर्च मिळणार आहे. प्रत्येक खेळाडूसाठी पाच लाख वैद्यकीय विमा व २५ लाख रुपयांच्या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा फायदा दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी दहा लाख रुपयांऐवजी ३० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाईल. राष्ट्रीय स्तरावरील संघटनांना क्रीडा साहित्य घेण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.