गेल्याच महिन्यात नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर महान खेळाडू मॅग्नस कार्लसनने टेबलवर हात आपटण्याचा आक्रस्ताळेपणा केला होता, ज्यावर जगभर अनेक ‘मीम’ तयार करण्यात आल्या. या वेळी मात्र मॅग्नसने खिलाडूवृत्ती दाखवून उलट जगज्जेत्या गुकेशविरुद्ध लागोपाठ दुसरा पराभव पत्करल्यानंतर हस्तांदोलन केले आणि बाहेर जाऊन गुकेशच्या खेळाची खूप स्तुती केली.

स्पर्धेच्या आधी याच मॅग्नसने गुकेशला मी जलदगती प्रकारातील सामान्य खेळाडूंपैकी एक मानतो असे म्हटले होते. गुकेशने खरा विजेता कसा असतो असे दाखवताना या स्पर्धेत जलदगती प्रकारातील सर्व रथिमहारथींपुढे आघाडी घेतली आहे.

मॅग्नस पांढऱ्या मोहऱ्यांकडून खेळताना त्याला हरवणे फार कठीण असते. गुकेशविरुद्ध त्याने इंग्लिश प्रकाराने सुरुवात केली आणि हळूहळू आपला वरचष्मा प्रस्थापित केला. परंतु हे करताना त्याने आपल्या राजाची सुरक्षितता लक्षात घेतली नाही. युद्धशास्त्राचा (आणि बुद्धिबळात पण) एक नियम आहे. ज्या वेळी प्रतिस्पर्धी दोन बाजूंवर एका वेळी खेळत असतो, त्या वेळी त्याच्या मध्यभागावर प्रतिहल्ला केल्यास तो हमखास पराभूत होतो. नियम म्हणून मॅग्नसला हे माहिती होते, त्याने (त्याच्या मते) पूर्ण तटबंदी केलेली होती. मात्र, अचानक गुकेशने प्याद्यांच्या तीन स्फोटक चाली केल्या आणि मॅग्नसच्या तथाकथित बचावाला खिंडार पडले. त्यातून आतापर्यंतचा सर्वांत महान खेळाडू समजला जाणारा मॅग्नस स्वत:च्या राजाला वाचवू शकला नाही.

माजी जगज्जेता (आणि मॅग्नसच्या मते त्याच्याहून सरस) गॅरी कास्पारोव्ह याला गुकेशची किती स्तुती करू असे झाले होते. गुकेशला एका डावात हरवणे म्हणजे तब्बल पाच डाव खेळण्यासारखे असल्याचे गॅरीचे मत आहे. ‘‘आता जिंकलो असे प्रतिस्पर्ध्याला वाटत असताना गुकेश काहीतरी नवीन बचाव काढतो आणि पुनरागमन करतो. पुन्हा त्यातून मार्ग काढून गुकेशला मागे रेटावे तर हा पठ्ठया परत लढायला हजर!’’ असे गॅरी म्हणाला.

खऱ्या विजेत्यांची सर्व लक्षणे गुकेशमध्ये पाहायला मिळतात. त्याला जलदगती प्रकारात लिंबू-टिबू समजणाऱ्या खेळाडूंना गुपचूप तयारी करून गुकेशने मात दिलेली आहे आणि खरा खेळाडू हा कायम शिकत असतो ही शिकवण त्याने आपल्या खेळातून सर्वच उगवत्या खेळाडूंना दिली आहे. त्याच्याशी खेळणे म्हणजे एखाद्या संगणकाशी खेळण्यासारखे आहे असे गॅरी म्हणतो ते उगाच नाही. संगणकाची सुधारित आवृत्ती सतत येत असते. त्याप्रमाणे गुकेशची जलदगती आवृत्ती आपल्याला पाहायला मिळत आहे असे म्हणायला हरकत नाही.

स्पर्धा अजून संपलेली नाही पण पहिलीच फेरी पोलंडच्या यान डुडाशी हरणाऱ्या गुकेशने नंतर तब्बल पाच डाव सलग जिंकून आघाडी घेतलेली आहे. अजून तीन फेऱ्या बाकी आहेत आणि गुकेशविरुद्ध उरलेले सर्व खेळाडू त्वेषाने खेळणार यात काही शंका नाही. गुकेश त्यांनाही कसे हाताळतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.
रघुनंदन गोखले
(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)