Harbhajan Singh on Asia Cup 2025 IND vs PAK Match: आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार असल्याचं वेळापत्रकामुळे निश्चित झालं आहे. आशिया चषक २०२५ येत्या ९ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबरला होणार आहे. पण आता हरभजन सिंगच्या वक्तव्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

“रक्त आणि पाणी एकत्र नसतं. आपण त्यांना इतकं महत्त्व का देतो?” असा प्रश्न हरभजन सिंगने उपस्थित केला आहे. आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरूद्ध खेळणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना हरभजनने हे वक्तव्य केलं आहे.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे आशिया चषकातील सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे. हरभजन सिंग अलीकडेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेचा भाग होता, जिथे इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध गट सामना आणि सेमी-फायनल सामने खेळण्यास नकार दिला. या संघात शिखर धवन, युवराज सिंग, हरभजन सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना आणि युसूफ पठाण यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबर खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला.

जवानांच्या तुलनेत आपण साधा क्रिकेट सामना सोडू शकत नाही – हरभजन सिंगने BCCIला सुनावलं

आता आशिया कप (Asia Cup 2025) आधी, हरभजन सिंगचं म्हणणं आहे की, देश सर्वप्रथम येतो आणि सूर्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानेही पाकिस्तानबरोबर खेळण्यास नकार द्यावा, असं त्याचं म्हणणं आहे. हरभजन सिंगने सांगितलं, “कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. खरंतर अगदी सोपं आहे. आपल्या देशाचा जवान सीमेवर उभा आहे. त्यांच्या कुटुंबापासून ते दूर राहतात. अनेकप्रसंगी त्यांना वीरमरण येतं, शहीद होतात आणि पुन्हा आपल्या घरीदेखील परतू शकत नाही. जवान आपल्यासाठी खूप मोठा त्याग करतात. या जवानांच्या तुलनेत आपण एक साधा क्रिकेट सामना सोडू शकत नाही.””

““सीमेवर लढाई सुरू असते, दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि आपण क्रिकेट खेळायला जातोय. जोपर्यंत हे मोठे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत क्रिकेट सामना होणं हा फारच लहानसा विषय आहे,” असंही हरभजन सिंग पुढे म्हणाला.

“आपली जी ओळख आहे ती या देशामुळे आहे. भले तुम्ही खेळाडू असाल, कलाकार असाल किंवा मग अजून कोणीही, या देशापेक्षा मोठं कोणीच नाहीये. देश सर्वात आधी येतो. देशापुढे एखादा क्रिकेट सामना न खेळणं ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे.”, असं हरभजन सिंग पुढे म्हणाला.

आशिया चषक २०२५ साठीचे सामने दुबईमध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी ओमान, भारत, युएई आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटात आहेत. तर दुसऱ्या ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेष हाँगकाँग आणि श्रीलंका हे देश आहेत.