सध्या करोनाबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करोनासंबंधी प्रॉटोकॉलचे उल्लंघन करण्यापासून जिल्ह्याधिकाऱ्यांना एका तरुणाच्या कानशिलात लावण्यापर्यंतचे व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच एका नव्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग भडकला आहे. या व्हिडिओमध्ये दोन लोक एका मुलाला मारहाण करत असून हरभजनने आपला संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – मोहालीतील स्टेडियमला दिले जाणार दिवंगत महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचे नाव

व्हिडिओमधील मुलाला करोनाची लस घेण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचे दिसत आहे. तो लस घेण्यास नकार देतो, तेव्हा दोन जण त्याला मारहाण करण्यास सुरवात करतात. हा व्हिडिओ बंगळुरूतील असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता समोर आलेली नाही. हा व्हिडिओ हरभजननेही शेअर केला असून त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

हरभजन म्हणाला, ”लाजिरवाणी गोष्ट. या मुलाला चाचणीसाठी का मारहाण केली जाते? अशाप्रकारे आपण करोनाविरुद्धची लढाई जिंकू? हे खूप चुकीचे आहे.” काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये छत्तीसगडच्या अधिकाऱ्याने एका मुलाच्या कानशिलात लगावली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली.

हेही वाचा – सागर राणा हत्याकांड : सुशील कुमारचं नोकरीवरून निलंबन