चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पत्करावा लागलेला पराभव आजही अनेक भारतीयांच्या मनात सलतोय. भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले, मात्र एकट्या हार्दीक पांड्याने पाकिस्तानी आक्रमणाचा नेटाने सामना केला. हार्दीक पांड्या सामना भारताच्या बाजूने झुकवणार अस वाटतच असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पांड्या रनआऊट झाला आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केलं.

यावेळी मैदानात हार्दीक पांड्याचं संतापलेलं स्वरुप सर्व भारतीयांनी पाहिलं होतं. अनेकांनी सोशल मीडियावरुन यासाठी रविंद्र जाडेजाला जबाबदार ठरवलं. तर काहींनी अशावेळी जाडेजाने आपल्या विकेटवर पाणी सोडायला हवं होतं असही मत व्यक्त केलं. मात्र त्या सामन्यात धावांची बरसात करणाऱ्या हार्दीक पांड्याचं या प्रकाराविषयी वेगळचं मत आहे.

वेस्ट इंडिजमध्ये पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पांड्याने घडलेल्या प्रकाराविषयी म्हणलं की, ”तो त्या सामनात्यातला एक महत्वाचा क्षण होता. मी चांगली फलंदाजी करत होतो त्यामुळे मी भारताला या परिस्थितीतही सामना जिंकवून देईन अशी आशा मला होती. मात्र त्याचवेळी मी बाद झाल्यामुळे मला प्रचंड राग आला होता. मात्र जितक्या लवकर मला राग येतो तितक्या लवकर मी शांतही होतो. ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर अवघ्या ३ मिनीटात मी ताळ्यावर आलो मी इतर खेळाडूंसोबत हसत खेळत होतो. मला बघून माझे काही सहकारीही चांगलेच हसत होते.”

या सामन्यात जर हार्दीक पांड्या अखेरपर्यंत टीकला असता तर त्याने नक्कीच भारताला विजय मिळवून दिला असता. याचसोबत ही खेळी त्याच्या करिअरच्या दृष्टीनेही एक टर्निंग पॉईंट ठरु शकली असती. मात्र दुर्दैवाने तसं घडलं नाही आणि सामना पाकिस्तानने जिंकत चॅम्पियन्स करंडक आपल्या नावे केला.