England vs South Africa Records: इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. फिल सॉल्ट आणि आणि जोस बटलर यांच्या वादळी खेळीच्या बळावर इंग्लंडने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडून काढला आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या आमंत्रणाचा स्वीकार करून इंग्लंडच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणावर चांगलाच हल्लाबोल केला. सलामीला फलंदाजी आलेल्या फिल सॉल्टने अवघ्या ३९ चेंडूत दमदार शतक झळकावलं. हे इंग्लंडसाठी टी-२० क्रिकेटमध्ये कुठल्याही फलंदाजाने झळकावलेलं सर्वात वेगवान शतक आहे. त्याला साथ देत जोस बटलरने ८३ धावांची वादळी खेळी केली. यासह इंग्लंडने २० षटकाअखेर २ गडी बाद ३०४ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. ही टी – २० क्रिकेटमध्ये आयसीसीच्या फुल मेंबर राष्ट्राविरुद्ध उभारली गेलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

इंग्लंडकडून फलंदाजी करताना फिल सॉल्टने ६० चेंडूत १४१ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि ८ षटकार खेचले. तर जोस बटलरने अवघ्या ३० चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांचा सहाय्याने ८३ धावांची खेळी केली. शेवटी जेकब बेथलने १४ चेंडूत २६ धावा चोपल्या. या हॅरी ब्रुकने २१ चेंडूत ४१ धावा केल्या.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम हा झिम्बाब्वेच्या नावावर आहे. झिम्बाब्वेने गॅंबियाविरुद्ध खेळताना ४ गडी बाद ३४४ धावांचा डोंगर उभारला होता. तर नेपाळने मंगोलियाविरुद्ध खेळताना ३ गडी बाद ३१४ धावा केल्या होत्या. आयसीसीच्या फुल मेंबर राष्ट्राविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम हा भारतीय संघाच्या नावे होता. भारताने बांगलादेश विरुद्ध खेळताना ६ गडी बाद २९७ धावा केल्या होत्या. आता इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३०४ धावा करून हा सर्वात मोठा विक्रम मोडून काढला आहे.