Hulk Hogan Death News जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार टेरी बोलिया ज्यांना संपूर्ण जग ‘हल्क होगन’ या नावाने ओळखतं, याच हल्क होगन यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टमुळे होगन यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढावली, ज्यानंतर होगन यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारां दरम्यान होगन यांचा मृत्यू झाला. होगन यांना स्ट्रेचरवरून त्यांच्या घरातून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.
१९९० च्या दशकात हल्ग होगन यांची संपूर्ण जगाला भुरळ
१९९० च्या दशकात हल्क होगन हे नाव केवळ WWE साठी मर्यादित नव्हतं, तर ते एक ‘पॉप कल्चर आयकॉन’ बनलं होतं. त्यांच्या दमदार शरीरयष्टी खास व्यक्तिमत्त्व यामुळे ते प्रत्येक घरात ओळखले जात होते. केवळ WWE च नाही, तर त्यांनी काही हॉलिवूड चित्रपटांतही अभिनय करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
अनेकांच्या बालपणीचा हिरो काळाच्या पडद्याआड
९० च्या दशकात अनेकांच्या बालपणीचा हिरो अशी ओळख असलेले हल्क होगन यांनी तो काळ खरोखर गाजवला होता. WWE हे तेव्हा जगभरात पाहिलं जात होतं. हल्क होगन यांची स्टिकर्सही निघाली होती आणि त्यांचे चाहते जगभरात होते. याच हल्क होगन यांचा आज कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला. त्यांना स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याची प्राणज्योत मालवली. मे महिन्यात हल्क हॉगनवर मानेची शस्त्रक्रिया झाली होती. यूएस वीकलीच्या वृत्तानुसार गेल्या महिन्यात त्याच्यावर गंभीर हृदयशस्त्रक्रियाही झाली होती.
WWE ने वाहिली श्रद्धांजली
WWE कडून हल्क होगन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. होगन यांच्यामुळे १९८० आणि १९९० च्या दशकात WWE ला जगभरात ओळख मिळाली. आम्ही होगन यांच्या कुटुंबाच्या दुःखात आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत अशी पोस्ट WWE ने केली आहे.
पिळदार शरीर पिवळा किंवा लाल पोशाख आणि गॉगल ही त्यांची ओळख
हल्क होगन हे फक्त पैलवान नव्हते तर तरुणांसाठी लहान मुलांसाठी ते त्या काळात आयकॉनच ठरले होते. पिळदार शरीरयष्टी, पिवळा आणि लाल पोशाख, डोळ्यांवर गॉगल आणि हनुवटीपर्यंत आलेली पिळदार मिशी हे त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व होतं. Say Your Prayers, Eat Your Vitamins हे हल्क होगन यांचं घोषवाक्यही प्रसिद्ध झालं होतं. रेसेलमेनिया ३ मध्ये आंद्रे द जायंट विरोधात हल्क यांनी लढलेला सामना त्या काळात ९३ हजारांहून अधिक लोकांनी थेट पाहिला होता.
हल्क होगन यांचा दोनदा घटस्फोट
हल्क यांचा दोनवेळा घटस्फोट झाला आहे. लिंडा ही त्यांची पहिली पत्नी. हल्क आणि लिंडा यांना ब्रुक आणि निक ही दोन मुलं आहेत. २००७ मध्ये लिंडा आणि हल्क विभक्त झाले. त्यानंतर हल्क यांनी जेनिफर मॅडॅनियलशी लग्न केलं. २०२२ मध्ये हे नातंही संपुष्टात आलं.