आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या नियमावलीत अनेक बदल झाले आहेत. या बदलांशी जुळवून घेण्यास मी यंदा प्राधान्य देणार आहे, असे भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव िबद्रा याने सांगितले. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाने विविध स्पर्धाच्या नियमावलीत बदल केला आहे. त्यानुसार अंतिम फेरीचे गुण शून्यापासून सुरु होणार आहेत. त्यामध्ये पात्रता फेरीतील गुणांचा समावेश केला जाणार नाही. दहा मीटर एअर रायफल प्रकारात दशांश गुणांकन पद्धत सुरु करण्यात आली आहे. या नवीन नियमांचा मी बारकाईने अभ्यास करीत आहे आणि सरावातही त्याचा उपयोग करीत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती व भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) यांच्यातील वाद लवकरच मिटेल आणि आयओएवरील बंदी लवकरच उठविली जाईल, अशी आशा बिंद्राने व्यक्त केली.