आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) आगामी चॅम्पियन करंडक स्पर्धेतील विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षिसाची नुकतीच घोषणा केली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आयसीसीने बक्षिसाच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. आयसीसी आगामी स्पर्धेसाठी सहभागी संघांवर बक्षिसाच्या रुपात तब्बल ४५ लाख डॉलर्स इतकी रक्कम मोजणार आहे. यात विजेत्या संघाला सुमारे १४ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी चॅम्पियन करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते.
आयसीसीने जारी केलेल्या माहितीनुसार, इंग्लंड येथे आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सहभागी आठ संघाना एकूण ४५ लाख डॉलर्स रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यातील सुमारे निम्मी रक्कम विजेत्या संघाला मिळेल. तर विजेत्याला मिळणाऱ्या संघाच्या निम्मी रक्कम ही उपविजेत्याला मिळेल. २०१३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदाच्या स्पर्धेतील बक्षीस तब्बल ५०० हजार डॉलर्संनी वाढवण्यात आले आहे. आयसीसीने म्हटले आहे की, या स्पर्धेतील उपविजेत्याला सुमारे ७ कोटी इतकी रक्कम मिळणार आहे. जे संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचतील त्या दोन संघांना प्रत्येकी ४५० हजार डॉलर्स इतकी रक्कम बक्षीस रुपात मिळेल. तर उपांत्यफेरीपूर्वीच आव्हान संपुष्टात आलेल्या संघांना प्रत्येकी ९० हजार डॉलर्स आणि दोन्ही गटातील तळाच्या स्थानवर असलेल्या संघाना प्रत्येकी ६० हजार डॉलर इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल.
आयसीच्या आठव्यांदा रंगणाऱ्या स्पर्धेत यंदा क्रमवारीत अव्वल आठ संघ सहभागी झाले असून दोन गटात संघाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. गतविजेता भारतीय संघ ‘ब’ गटात खेळताना दिसणार असून या गटात त्यांना पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या संघाचे आव्हान असेल. तर ‘अ’ गटात इंग्लड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे