ICC Asks PCB To Cancel Champions Trophy in POK: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने २०२५ मध्ये होणार असून अजूनही या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे आणि सर्व सामने पाकिस्तानात व्हावे, यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ठाम आहे. तर भारतीय संघ पाकिस्तानाला जाणार नसल्याचे सांगितले आहे. यादरम्यान आयसीसीने पाकिस्तान बोर्डाला एक मोठा धक्का दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणत्याही किंमतीत पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयने आयसीसीला कळवले होते. तेव्हापासून पाकिस्तान आयसीसीकडे यामागील कारणाची मागणी करत आहे. तर बीसीसीआयने आधीच सुरक्षेचे कारण सांगितले आहे. दरम्यान, पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा आयोजित केला होता. पीओकेच्या तीन शहरांमध्ये ही ट्रॉफी घेऊन जाणार असल्याची चर्चा होती, परंतु आता आयसीसीने त्यांना स्पष्टपणे नकार दिला आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी जाणार नाही.

हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…

चॅम्पियन्स ट्रॉफीचा करंडक १४ नोव्हेंबरला इस्लामाबादला पोहोचणार असल्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून १४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी करण्यात आली. यानंतर १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत करंडक पाकिस्तानमध्ये नेला जाईल. पीसीबीने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. यामध्ये पीसीबीने सांगितले होते की, करंडक स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी जाईल. या चार ठिकाणांपैकी फक्त मारी हे ठिकाण पाकिस्तानचा भाग आहे. याशिवाय इतर तीन ठिकाणे स्कर्दू, हुंजा आणि मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये येतात.

हेही वाचा – १० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम

पाकिस्तानने याची घोषणा करताच बीसीसीआयने आक्षेप घेतला आणि आयसीसीने यावर तात्काळ कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला करंडक कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या कृतीमुळे भारतासह टीम इंडियाचे चाहते आणखी संतप्त झाले आहेत, परंतु बीसीसीआयने आयसीसीला वेळीच याची माहिती दिली आणि पाकिस्तानला तसे करण्यापासून रोखले.

आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लिहिले होते की, पाकिस्तान तयार राहा. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या करंडक दौऱ्याची सुरुवात १६ नोव्हेंबरपासून इस्लामाबाद येथे होणार आहे, जी स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद सारख्या पर्यटन स्थळांनाही भेट देईल. आता आयसीसीच्या कारवाईनंतर पाकिस्तान मैदान बदलू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc asks pcb to cancels champions trophy 2025 tour in pok after bcci objection bdg