श्रीलंकेविरुद्ध आज सामना; स्मृती, पूनम, मिताली, एकता यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा
यजमान इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि त्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवत भारतीय संघाने महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी हॅट्ट्रिक साजरी केली आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजयी चौकार फटकावण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यांत भारताने चांगली फलंदाजी केली होती. या दोन्ही सामन्यांमध्ये स्मृती मंधानाने दमदार फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तिला जास्त धावा करता आल्या नव्हत्या. स्मृतीला या वेळी पूनम राऊत सुयोग्य साथ देताना दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध तिने चांगली फलंदाजी केली होतीच, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा पूनमने फटकावल्या होत्या. कर्णधार मिताली राजकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. भारताच्या अन्य फलंदाजांना जास्त संधी मिळालेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीला संधी मिळाली होती, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताच्या मधल्या फळीला अधिक संधी दिल्यास बाद फेरीपर्यंत भारतीय फलंदाजी अधिक परिपक्व होऊ शकतो.
गोलंदाजीमध्ये झुलन गोस्वामी हे भारताचे प्रमुख अस्त्र आहे. आतापर्यंत भारतीय गोलंदाजीचे दर्जेदार सारथ्य झुलनकडून पाहायला मिळाले आहे. गेल्या सामन्यात एकता बिश्तने पाच बळी मिळवत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे तिच्याकडून कामगिरीत सातत्य राखण्याची अपेक्षा असेल. या स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत चांगला मारा केला आहे, पण हा मारा अधिक भेदक कसा करता येईल, याकडे भारताने लक्ष देण्याची गरज आहे.
विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत श्रीलंकेला विजयाची चव चाखता आलेली नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांकडून श्रीलंकेला पराभव स्वीकारावा लागला आहे. श्रीलंकेची चमारी आथापथथू या एकमेव खेळाडूने आतापर्यंत स्पर्धेत छाप पाडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चमारीने नाबाद १७८ धावांची खेळी साकारली होती. महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही नेत्रदीपक खेळी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर त्यांची भिस्त मुख्यत्वेकरून चमारीवर असेल.
प्रतिस्पर्धी संघ
- भारत : मिताली राज (कर्णधार), एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मंधाना, मोना मेश्राम, नुझहत परविन, शिखा पांडे, पूनम राऊत, दीप्ती राऊत, सुष्मा वर्मा, पूनम यादव.
- श्रीलंका : इनोका रणवीरा (कर्णधार), चमारी अथापथथू, चंडिमा गुणरत्ने, निपुणी हंसिका, अमा कांचना, इशानी लोकुसुरिया, हर्षिता माधवी, दिलानी मनोदारा, हसिनी परेरा, चमारी पोगाम्पाला, उदेशिका प्रबोधनी, ओशाधी रणसिंघे, शशिकला सिरीवर्देना, प्रसादानी वीराकोडी, श्रीपाली वीराकोडी.
- वेळ : दु. ३.०० वा. पासून.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वहिन्यांवर.