India-W vs Pakistan-W Weather Update: महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना पाकिस्तान संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगणार आहे. याआधी झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारत आणइ पाकिस्तान हे दोन्ही संघ ३ वेळेस आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता. या सामन्यात अनेक नाट्यमय घटना देखील घडल्या होत्या. आता भारतीय महिला संघाकडून देखील दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या सामन्याआधी स्पष्ट झालं आहे की, भारत- पाकिस्तानचे खेळाडू या सामन्यातही हस्तांदोलन करणं टाळतील. या सामन्यादरम्यान हवामान कसं असेल? जाणून घ्या.

भारत- पाकिस्तान सामन्यात पाऊस हजेरी लावणार?

हा सामना श्रीलंकेतील कोलंबोत रंगणार आहे. या सामन्यादरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाच वर्तवण्यात आला आहे. सामना सुरु होण्याआधी सकाळच्या वेळी जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. अॅक्यूवेदरने दिलेल्या वृत्तानुसार, कोलंबोत सकाळी १२ वाजता पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्के इतकी असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची सुरूवात दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. दुपारी ३ च्या दरम्यान ९९ टक्के ढगाळ वातावरण असेल. यादरम्यान पाऊस पडू शकतो. त्यामुळे सामन्यात व्यत्यत निर्माण होऊ शकतो.

भारतीय संघ दुसऱ्या विजयाच्या प्रयत्नात

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. पण पाकिस्तानविरूद्धचा सामना श्रीलंकेतील कोलंबोत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना श्रीलंकेविरूद्ध पार पडला होता. गुवाहाटीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार, श्रीलंकेवर ५९ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. पाकिस्तानविरूद्ध होणारा सामना हा भारतीय संघाचा दुसरा सामना असणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ लागोपाठ दुसरा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

पाकिस्तान विरूद्ध हेड टू हेड रेकॉर्ड

भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचा विजयाचा रेकॉर्ड हा १०० टक्के राहिला आहे. हे दोन्ही संघ ११ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने सर्व ११ सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यातही एकतर्फी विजयाची नोंद करू शकतो. महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघ २ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ २ सामन्यांमध्ये ३ गुणांची कमाई करून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.