Womens World Cup Semifinal Scenario: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमानुसार १५० धावांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत आणखी मजबूत स्थितीत पोहोचला आहे. तर पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडला आहे. दरम्यान इतर संघांसाठी कसं आहे समीकरण? जाणून घ्या.

भारतीय संघासाठी कसं आहे समीकरण?

भारतीय संघाने ५ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने ३ सामने गमावले आहेत. त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. भारतीय संघाला जर सरळ सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. हे पुढील सामने न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध होणार आहेत. दरम्यान एकही सामना गमावला, तर भारताला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

न्यूझीलंड संघासाठी समीकरण

न्यूझीलंडने या स्पर्धेतील ५ पैकी १ सामना जिंकला आहे, तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत. ४ गुणांसह हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. न्यूझीलंडचे पुढील २ सामने भारत आणि इंग्लंडविरुद्ध होणार आहेत. हे दोन्ही सामने जर न्यूझीलंडने जिंकले तर, तर न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. पण जर एकही सामना गमावला तर, उर्वरित संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

श्रीलंकेसाठी समीकरण

श्रीलंकेने आतापर्यंत ६ सामन्यांपैकी १ सामना जिंकला आहे तर, ३ सामने गमावले आहेत आणि २ सामने अनिर्णित राहिले आहेत. हा संघ ४ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. श्रीलंकेचा एकमेव शिल्लक सामना हा पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. जर श्रीलंकेला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर पाकिस्तानविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं असणार आहे.