धुक्यातून हरवलेली वाट काढत.. अंगावर बोचरे वारे झेलत.. तुरळक ठिकाणी लाभलेल्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात.. एकसारख्याच दिसणाऱ्या प्रतिस्पध्र्याचे आव्हान मागे सारून केनिया आणि इथिओपियाच्या धावपटूंनी अपेक्षेप्रमाणे या वर्षीही मुंबई मॅरेथॉनवर अधिराज्य गाजवले. मुंबई मॅरेथॉनच्या ११ पर्वापैकी आठ वेळा केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व प्रस्थापित केले. केनियाच्या रुटोने अखेरच्या क्षणी सुसाट वेग पकडत पुरुषांच्या गटाचे जेतेपद पटकावले. महिलांमध्ये दिनकेश मेकाश हिने सुवर्णपदकावर नाव कोरले.
सकाळी ७.२० वाजता पूर्ण मॅरेथॉन शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून ते मरिन ड्राईव्हपर्यंत मोजक्या प्रेक्षकांची उपस्थिती लाभली होती. पण सूर्य जसजसा वरती येत होता, तसतशी प्रेक्षकसंख्येत भर पडत होती. पण गेल्या १० वर्षांच्या तुलनेने ही प्रेक्षकसंख्या निम्म्यापेक्षा कमी जाणवत होती. प्रेक्षकही रविवारच्या मूडमध्ये होते.
२५ किमीपर्यंत एकत्र धावणाऱ्या दहा जणांच्या टोळक्यातून रुटो, लॉरेन्स किमाईयो आणि फिलेमोन बारू यांनी अन्य स्पर्धकांना मागे टाकले होते. जवळपास आठ किलोमीटपर्यंत हेच तिघे आघाडीवर होते. त्यामुळे यांच्यापैकीच एक जण सुवर्णपदकावर मोहोर उमटवणार, हे निश्चित झाले होते. अखेरच्या दोन किमी.च्या शर्यतीत अन्य दोघांपेक्षा उंच वाटणाऱ्या रुटोने चौथा गिअर टाकत २ तास ९ मिनिटे ३३ सेकंदात ही शर्यत पार करत सुवर्णपदकाची कमाई केली. पण काही सेकंदाने त्याचा स्पर्धाविक्रम हुकला तरी विजेतेपदाबद्दल त्याने समाधान व्यक्त केले. केनियाच्या किमाईयो याला १२ सेकंदाच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याचा सहकारी बारू २.०९.५८ सेकंद अशी वेळ नोंदवून तिसरा आला. केनियाच्या आठ धावपटूंनी अव्वल दहा जणांमध्ये स्थान मिळवले.
महिलांमध्ये आठव्यांदा इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व राहिले. इथिओपियाच्या मेकाशने ही शर्यत २.२८.०८ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. मॅरेथॉनमध्ये पदार्पण करणारी केनियाची ग्लॅडिस किपसोई २.२९.५३ सेकंदासह दुसरी आली. इथिओपियाची बिझुनेश उर्गेसा हिने २.३०.०० सेकंदासह तिसरे स्थान प्राप्त केले.
मॅरेथॉन लवकर सुरू करण्याची मागणी
सकाळच्या थंड वातावरणात पूर्ण मॅरेथॉन शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर २१ कि.मी.चे अंतर पार केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील परतीच्या मार्गावर धावपटूंना उन्हाच्या झळा बसू लागतात. उन्हामुळे धावपटूंच्या कामगिरीवर परिणाम होत असल्यामुळे अनेक धावपटूंनी पुढील वर्षीपासून पूर्ण मॅरेथॉन शर्यत लवकर सुरू करण्याची मागणी केली. याबाबतीत केनियाच्या आणि भारतीय धावपटूंचा सूर एकच होता.
घराचे नूतनीकरण करणार -ज्योती गवाते
गेली पाच वर्षे परभणीची ज्योती गवाते मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे. दरवर्षी कामगिरीत सुधारणा करणाऱ्या ज्योतीने पूर्ण मॅरेथॉन भारतीय महिलांमध्ये तिसरे स्थान पटकावले. ज्योतीचे वडील एसटी बँकेत सफाई कामगार आहेत. घरी तिच्यासह तीन भावंडे आहेत. घरची परिस्थिती बेताची असूनही ज्योती या खेळाची आवड स्वत:च्या पैशाने जोपासते. परभणीतील साई केंद्राच्या रवी सरांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. मॅरेथॉनजिंकून मिळालेल्या पैशातून घराचे नूतनीकरण करणार असल्याचे ज्योतीने सांगितले.
हौश्या-गवश्यांना आवरा
मॅरेथॉन शर्यत म्हणजे हौश्या-गवश्यांची जत्राच असते. पूर्ण मॅरेथॉनच्या किमान दोन तास आधी हौशी धावपटूंसाठीची मॅरेथॉन सुरू होते. या शर्यतीचा मार्ग आणि अव्वल धावपटूंसाठीच्या पूर्ण मॅरेथॉनचा मार्ग एकच असतो. मात्र परतीच्या मार्गावर हौशी अॅथलिट अव्वल धावपटूंच्या मार्गात अडसर बनल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले. पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनचा विजेता इव्हान्स रुटोने मार्गात हौशी मंडळी येत असल्याने एकाग्रता भंग पावल्याचे सांगितले. मध्येच येणाऱ्या धावपटूला डावलून पुढे जाताना अॅथलिट्सना तारेवरची कसरत करावी लागते.
ललिता बाबरचा हॅट्ट्रिकसह स्पर्धाविक्रम!
केनिया आणि इथिओपियाच्या धावपटूंच्या शर्यतीत भारतीय खिजगणतीतही नसतात. भारतीय धावपटूंची स्पर्धा असते ती आपल्याच सहकाऱ्यांशी. भारतीय गटात साताऱ्याच्या ललिता बाबर हिने महिलांमध्ये सलग तिसऱ्यांदा पूर्ण मॅरेथॉन शर्यतीवर नाव कोरत मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धाविक्रमाची नोंद केली. पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटच्या करण सिंगने बाजी मारली. २५ वर्षांच्या ललिताने २.५०.३१ सेकंद अशी वेळ नोंदवत भारतीय महिला गटात नवा स्पर्धाविक्रम प्रस्थापित केला. तिने २०१२मध्ये रचलेला २.५३.३५ सेकंदाचा स्वत:चाच विक्रम मागे टाकला. या विजयासह तिने पाच लाखांसह एक लाख रुपयांचे बोनस इनामही जिंकले. तिची रेल्वेतील सहकारी विजयमाला पाटीलने २.५९.५८ सेकंदासह दुसरा, तर ज्योती गवातेने ३.०२.५९ सेकंदासह तिसरा क्रमांक पटकावला. पुरुषांमध्ये करणने २.२४.०८ सेकंदासह पहिला येण्याचा मान प्राप्त केला. रशपालने (२.२४.३८) दुसरा, तर गतविजेता बिनिंग लिंगखोईने (२.२४.४०) तिसरा क्रमांक पटकावला. याच शर्यतीद्वारे २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणाऱ्या रामसिंग यादवने गुडघ्याच्या दुखापतीमुळे शर्यत अर्धवट सोडून दिली. २१ किमी. अंतराच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत सुधा सिंगने सुवर्णपदकावर नाव कोरले. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत दुसरी, तर किरण सहदेव तिसरी आली. पुरुषांमध्ये इंदरजीत पटेलने प्रथम क्रमांक पटकावला. सोजी मॅथ्यू आणि मान सिंगने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.

मॅरेथॉनचे निकाल
पूर्ण मॅरेथॉन- पुरुष
१) इव्हान्स रुटो (केनिया) ०२:०९:३३. २) लॉरेन्स किमाईयो (केनिया), ०२:०९:४५. ३) फिलेमोन बारू (केनिया), ०२:०९:५८.
पूर्ण मॅरेथॉन- महिला
१) दिनकेश मेकाश (इथिओपिया)    ०२:२८:०८. २) ग्लॅडीस किपसोई (केनिया), ०२:२९:५३, ३) बिझुनेश उर्गेला (इथिओपिया), ०२:३०:००
पूर्ण मॅरेथॉन- भारतीय पुरुष
१) करण सिंग, ०२:२४:०८
२) रशपाल सिंग, ०२:२४:३८
३)बिनिंग लिंगखोई, २:२४:४०
पूर्ण मॅरेथॉन- भारतीय महिला
१) ललिता बाबर ०२:५०:३१
२) विजयमाला पाटील, ०२:५९:५८
३) ज्योती गवाते, ०३:०२:५९
अर्ध मॅरेथॉन- पुरुष
१) इंदरजीत पटेल , १:०४:५६. २) सोजी मॅथ्यू  ०१:०५:४५. ३) मान सिंग, ०१:०६:१७.
अर्ध मॅरेथॉन- महिला
१) सुधा सिंग ०१:१८:२४
२) कविता राऊत ०१:२१:१५
३) किरण सहदेव, ०१:२१:५७