चुरस, स्पर्धा, थरार यांची अनुभूती देणाऱ्या दक्षिण कोरियातील इन्चॉन येथे गेले पंधरा दिवस रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे सूप वाजले. रंग, नृत्य आणि जल्लोष यांनी भारलेल्या दिमाखदार समारोप सोहळ्यानंतर सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. बलाढय़ चीनने गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले तर भारताने आठवे स्थान मिळवले.
सांस्कृतिक कार्यक्रमानंतर इन्चॉन येथील मुख्य स्टेडियममध्ये आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद फहाद अल सबाह यांच्या हस्ते औपचारिक समारोप झाला. आशियाई ऑलिम्पिक परिषदेचा ध्वज उतरवण्यात आला, ज्याद्वारे स्पर्धेचा अधिकृतरीत्या शेवट झाला. या स्पर्धेत ३६ विविध क्रीडा प्रकारांत ४५ विविध देशांचे खेळाडू सहभागी झाले होते.
या सोहळ्याला दक्षिण कोरियाचे पंतप्रधान जुंग होंगवन, संयोजन समितीचे अध्यक्ष किम योंगसू, कोरियाच्या ऑलिम्पिक समितीचे प्रमुख किम जुंगहेअंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंना खुला प्रवेश असलेल्या या सोहळ्याचे सूत्र वन एशिया असे होते. सांस्कृतिक सोहळ्यात रेनबो कॉअर या दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय नृत्य संस्थेच्या कलाकारांनी शांततेचा संदेश देत नृत्य सादर केले. राष्ट्रीय ग्युगक केंद्र यांच्यासह दक्षिण कोरियाच्या पारंपरिक खेळ असलेल्या तायक्वांदोपटूंनी आपले कौशल्य सादर केले. यानंतर सरोटोनिन क्लब ड्रमर्स समूहाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आशियाई क्रीडा स्पर्धेची मशाल आणि ध्वज पुढच्या स्पर्धेचे संयोजक असलेल्या जकार्ताला सोपवण्यात आले. स्पर्धेतील मूल्यवान खेळाडूचा पुरस्कार चार सुवर्णपदक विजेता जपानचा जलतरणपटू कोसुके हागिनोने पटकावला.
५७ पदकांसह भारताला आठवे स्थान
२०१० आशियाई स्पर्धेच्या तुलनेत पदकांची संख्या घटली
भारताच्या ६७९ जणांच्या चमूने ५७ पदकांसह इन्चॉन नगरीचा निरोप घेतला. भारताने ११ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३७ कांस्यपदकांसह गुणतालिकेत आठवे स्थान पटकावले. चार वर्षांपूर्वी गुआंगझाऊ, चीन येथे झालेल्या स्पर्धेत भारताने १४ सुवर्णासह ६५ पदकांवर नाव कोरले होते. प्रशिक्षण, प्रगत प्रशिक्षणासाठी विदेशवारी, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे मदत या सगळ्यानंतरही गुआंगझाऊ ते इन्चॉन या प्रवासात भारताच्या पदकांमध्ये घट झाली आहे.
क्रीडा महासत्ता असलेल्या चीनने तब्बल १५१ सुवर्ण, १०८ रौप्य आणि ८३ कांस्य मिळून खंडप्राय ३४२ पदकांवर कब्जा केला. यजमान दक्षिण कोरियाने ७९ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७७ कांस्य मिळून २३४ पदकांवर नाव कोरले. उगवत्या सूर्याचा देश असलेल्या जपानने ४७ सुवर्ण, ७६ रौप्य आणि ७७ कांस्यपदकांसह एकूण २०० पदकांची कमाई केली. गुआंगझाऊ स्पर्धेप्रमाणे गुणतालिकेत अव्वल तीन देशांनी आपले वर्चस्व कायम राखले.
भारतातर्फे अ‍ॅथलेटिक्सने सर्वाधिक १३ पदकांची कमाई केली. केवळ एका पदकासह बॅडमिंटनपटूंनी निराशाजनक कामगिरी केली.
महिला हॉकी संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती -हॉवगुड
भारतीय महिला हॉकी संघाने खरंतर सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळवायला पाहिजे होते. त्यांनी उपांत्य फेरीत निसटता पराभव स्वीकारला, अन्यथा त्यांनी विजेतेपदही मिळविले असते, असे भारतीय संघाचे मार्गदर्शक नील हॉवगुड यांनी सांगितले.
‘‘भारतीय संघाने मिळविलेल्या कांस्यपदकाबाबत मी पूर्णपणे समाधानी नाही. त्यांनी उपांत्य लढतीत कोरियाविरुद्ध अक्षम्य चुका केल्या अन्यथा आम्ही सोने लुटून आणले असते. कोरियापेक्षा आमचा खेळ चांगला झाला. मात्र या चुकाच आमच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. साखळी गटात चीनविरुद्ध शेवटच्या दोन मिनिटांमध्ये आम्ही केलेल्या चुकांचा फायदा चीनला मिळाला आणि आम्ही हा सामना गमावला. हा सामना आम्ही बरोबरीत ठेवला असता तरी आम्ही साखळी गटात अग्रस्थान घेतले असते,’’ असेही त्यांनी सांगितले.
सरिताच्या भावनांची जाणीव आहे -अल फहाद
बॉक्सिंगमधील पंचांच्या पक्षपाती निर्णयाबाबत भारताच्या सरिता देवी हिने व्यक्त केलेल्या भावनांची मला जाणीव आहे. काही वेळा अशा चुका होतात मात्र खेळाडूंनी संयमाने त्याचा स्वीकार केला पाहिजे असे आशियाई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अल फहाद अल सबाह यांनी येथे सांगितले.
सरिता हिला कांस्यपदक मिळाले होते. पंचांच्या निर्णयाचा निषेध करण्याच्या दृष्टीने तिने पदक वितरण समारंभानंतर हे पदक व्यासपीठावर ठेवले. तिच्या या अभिनव निषेधाबद्दल आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने तिच्यावर कारवाई करण्याचे ठरविले होते.
भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांची माफी मागितली तसेच सरिता हिनेदेखील माफी मागितल्यानंतर तिच्यावर कारवाई केली जाण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.
अल फहाद यांनी सांगितले, ‘‘खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे हाच आशियाई स्पर्धा आयोजित करण्यामागचा खरा हेतू असतो. अनेक खेळांमध्ये पंचांकडून नकळत चुका होत असतात. बॉक्सिंगबाबत खूप तक्रारी आल्या असून नवे नियम व गुणांकन पद्धतीबाबत अजूनही अनेक पंच अवगत झालेले नाहीत. खेळाडूंच्या भावना मी समजू शकतो. मात्र प्रत्येक खेळाडूने पदक व्यासपीठावर अन्य देशांचे खेळाडू असतात हे लक्षात ठेवले पाहिजे.’’