India vs England 5th Test, Ben Stokes: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना हा ३१ जुलैपासून ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. इंग्लंडने आपली पंरपरा कायम राखत सामन्याच्या एक दिवसाआधीच अंतिम अकराची घोषणा केली आहे. ज्यात ४ मोठे बदल करण्यात आले आहेत. या संघातून कर्णधार बेन स्टोक्ससह जोफ्रा आर्चर,डॉसन आणि ब्रायडन कार्स यांना विश्रांती देण्यात आली आहे.
मालिकेतील पाचवा सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण इंग्लंडचा संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडने जर हा सामना जिंकला, तर इंग्लंडचा संघ ही मालिका ३-१ ने आपल्या नावावर करू शकतो. तर दूसरीकडे भारतीय संघाकडे ही मालिका २-२ ने बरोबरीत आणण्याची संधी असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ देखील पूर्ण ताकदीने इंग्लंडचा सामना करताना दिसेल. मात्र, या सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.
बेन स्टोक्स निर्णायक कसोटीतून बाहेर
या संपूर्ण मालिकेत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या बेन स्टोक्सने चौथ्या कसोटीतही दमदार कामगिरी केली होती. त्याने गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले होते. तर फलंदाजी करताना दमदार शतकी खेळी केली होती. मात्र, आता उजव्या खांद्याला दुखापत असल्यामुळे तो या निर्णायक सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. त्याच्या जागी ओली पोपकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या सामन्यात इंग्लंडला बेन स्टोक्सची कमतरता नक्कीच जाणवू शकते. यासह अंतिम अकरात आणखी ३ मोठे बदल करण्यात आले आहेत. लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स यांना देखील या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यांना संघाबाहेर करण्याचं कारण देखील सांगण्यात आलेलं नाही. या चारही खेळाडूंच्या जागी गस एटकिंसन, जेकब बेथेल , जेमी ओव्हरटन आणि जोश टंग यांचा समावेश करण्यात आला आहे.
या सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ:
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रुक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, जेमी ओव्हरटन, जोश टंग