Akash Deep Joe Root No Ball Controversy: भारतीय संघाने बर्मिंगहममध्ये इतिहास घडवत इंग्लंडचा मोठा पराभव केला. भारताने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडचा संघ २७१ धावांत सर्वबाद झाल्याने टीम इंडियाने ३३६ धावांनी मोठा विजय नोंदवला. भारताच्या या विजयात गोलंदाज आकाशदीपने मोठी भूमिका बजावली आहे. ज्याने ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या टॉप फलंदाजी फळीला मैदानावर टिकू दिलं नाही. यामध्ये आकाशदीपने जो रूटला टाकलेला चेंडू सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, आकाशदीपने जो रूटला एका कमालीचा चेंडू टाकत क्लीन बोल्ड केलं. सर्वांनीच आकाशदीपचं कौतुक करत हा ‘बॉल ऑफ द सीरिज’ असल्याचं म्हटलं. सचिन तेंडुलकरनेही भारताच्या विजयानंतर जो रूटला टाकलेला चेंडू या मालिकेतील सर्वाेत्कृष्ट चेंडू असल्याचं म्हटलं.

आकाशदीपने जो रूटला टाकलेला हा चेंडू बॅकफूट नो बॉल होता अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. या चेंडूला बॅक-फूट नो-बॉल घोषित करायला हवे होते का? असं समालोचक अ‍ॅलिसन मिशेल यांचे मत आहे. आकाशदीपने ११ व्या षटकात रूटला ६ धावांवर बाद केलं. जो रूटची विकेट ही भारतासाठी खूप मोठी विकेट होती. जो रूट हा सध्याचा कसोटी क्रिकेटमधील अव्वल खेळाडू आहे आणि इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाजही होता.

रूट मैदानाबाहेर गेल्यानंतर बऱ्याच वेळाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट समालोचक अ‍ॅलिसन मिशेल यांनी बीबीसी टीएमएसवर समालोचन करताना म्हटले, “आकाशदीपचा हा चेंडू वाईड ऑफ द क्रीज होता, त्याचा पाय मागच्या क्रीजवर आहे. जवळपास दोन इंच बाहर आहे. कदाचित थोडा जास्तत. पण तेवढेच. त्याचा मागचा पाय लाईनच्या आत असला पाहिजे होता.

बॅकफूट नो बॉलवरून सुरू आहे चर्चा

क्रिकेटमध्ये दोन प्रकारचे नो-बॉल असतात, जेव्हा गोलंदाजाचा पुढचा पाय पॉपिंग क्रीजच्या बाहेर असतो तेव्हा फ्रंटफूट नो-बॉल आणि जेव्हा गोलंदाजाचा पाय रिटर्न क्रीजवर किंवा बाहेर असतो तेव्हा बॅकफूट नो-बॉल असतो. ज्या चेंडूवर रूटला आकाशदीपने क्लीन बोल्ड केलं. तो चेंडू टाकताना आकाश दीपचा पाय रिटर्न क्रीजच्या लाईनवर असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर तो नो-बॉल घोषित करावा अशी चर्चा सुरू झाली.

आकाशदीप नो बॉल व्हायरल ट्वीट

रवी शास्त्री आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यात कमेंट्री बॉक्समध्ये चर्चा झाली ज्यामध्ये दोघांनीही एमसीसी नियम २१.५.१ बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की चेंडू टाकताना आकाश दीपचा पाय रिटर्न क्रीजच्या वर हवेत होता आणि तो त्या लाईनला स्पर्श करत नव्हता. त्यामुळे नियमांनुसार हा चेंडू पूर्णपणे कायदेशीर होता.