Why Gautam Gambhir Fight with Oval Pitch Curator: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना लंडन ओव्हलच्या मैदानावर होणार आहे. या सामन्याच्या सराव सत्रादरम्यान कोच गौतम गंभीर आणि पिच क्यूरेटर यांच्यात वाद झाला. गंभीर आणि पिट क्यूरेटर यांच्यात नेमका वाद कशामुळे झाला याचं कारण समोर आलं आहे. पत्रकार परषदेत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी मैदानावर नेमकं काय घडलं याची माहिती दिली.
मँचेस्टर कसोटीनंतर भारताचा संघ २८ जुलै रोजी लंडनमध्ये दाखल झाला. यानंतर आज २९ जुलैला भारतीय संघ पहिल्या सराव सत्रासाठी मैदानावर उतरला. यादरम्यान गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर यांच्यात मोठा वाद झाला. पिच क्युरेटरने गौतम गंभीरची तक्रार करण्याची धमकीही दिली. यानंतर गंभीरचा पारा चढला आणि तो अजून संतापला. पण असं नेमकं काय घडलं की इतका मोठा वाद झाला, जाणून घेऊया.
भारताचे फलंदाजी कोच सितांशु कोटक म्हणाले, “जेव्हा आम्ही खेळपट्टी पाहण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांनी एका माणसाला पाठवून आम्हाला खेळपट्टीपासून २.५ मीटर दूर राहण्यास सांगितलं. आम्हाला हे ऐकून चकित झालं. सामना तोंडावर आहे आणि आम्ही जॉगर्स घालून पोहोचलो होतो. आम्हाला थोडं विचित्र वाटलं. आम्ही सर्वजण खूप क्रिकेट खेळलोय आणि मैदानावर वेळही घालवला आहे. मैदानाबाबत क्युरेटर्सना आपुलकी असतेच, पण त्यांनाही याची कल्पना हवी की ते ज्यांच्याशी बोलत आहेत ते लोकही अत्यंत कुशल आणि हुशार आहेत.”
फलंदाजी कोच पुढे म्हणाले, “तुम्ही पाहिलंत तर, कोणताही गोलंदाज स्पाईक्स घालून नव्हता. मैदान, खेळपट्टी खराब झाली नाही पाहिजे, हे आम्हालाही माहित आहे. अखेरीस ती क्रिकेटची खेळपट्टी आहे, २०० वर्षांपूर्वीची प्राचीन शोभेची वस्तू नाहीये की जी खराब होईल आणि फुटेल. आज आम्ही रबराचा तळ असलेले शूज घातले होते.”
“पिच क्युरेटर रोलरवर बसलेला होता आणि तिथूनच त्याने सपोर्ट स्टाफवर ओरडून त्यांना कूलर मैदानावर नेऊ नका असं सांगितलं. कुलर मैदानावर नेऊ नकोस हे तो सांगत होता. त्या कुलिंग बॉक्सचं वजन १० किलो होतं, त्याने इतका काही फरक पडणार नव्हता. खेळपट्टीबद्दल काळजी असणं चांगलचं आहे, पण इतकंही नाही. सपोर्ट स्टाफ हा मुख्य प्रशिक्षकाच्या हाताखाली काम करतो, त्यामुळे गौतम गंभीर त्याला सांगणारच की असं बोललं नाही पाहिजे.”, असं कोटक पुढे म्हणाले.
“प्रामाणिकपणे सांगायचं तर, ओव्हलवर येण्यापूर्वीच बहुतांश संघांना माहिती असतं की तिथल्या क्युरेटरशी जुळवून घेणं सोपं नाही,” असं सितांशु कोटक म्हणाले.