Asia Cup 2025 Shivam Dube Bowling: भारताविरूद्ध सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा संघ चांगल्या तयारीनिशी उतरला, याचा प्रत्यय पाकिस्तानचा सलामीवीर आणि इतर फलंदाजांनी दिला. याशिवाय भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये दोन झेल सोडले. पण भारताच्या गोलंदाजांनी सातत्याने भेदक गोलंदाजी करत सलामीवीर फरहानला झेलबाद केलं. गेमचेंजर ठरलेल्या शिवम दुबेच्या गोलंदाजीवर बॅट हवेत उडाली आणि त्याने आपली विकेट गमावली.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली पण फखर जमान लवकर झेलबाद झाला. संजूने टिपलेल्या फखरच्या झेलवरून देखील गदारोळ सुरू आहे. तर दुसरा सलामीवीर फरहानने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने सईम अयुबसह ७० अधिक धावांची भागीदारी रचली.

साहिबजादा फरहान ४५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावा केल्यानंतर बाद झाला. तर भारताकडून शिवम दुबेने उत्कृष्ट गोलंदाजी करत आधी सईम अयुबला माघारी धाडलं आणि त्यानंतर स्पेलमधील पुढील षटकात फरहानला झेलबाद केलं. शिवम दुबेच्या चेंडूवर फरहान मोठा फटका खेळण्यासाठी गेला आणि त्याची बॅट हवेत उडाली, त्यासह चेंडू उंच हवेत गेला. चेंडू हवेत जाताच कर्णधार सूर्यादादाच्या दिशेने गेला आणि त्याने कोणतीही चूक न करता कमालीचा झेल टिपला.

फरहानने बाद होण्यापूर्वी कमालीची खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने दणदणीत षटकार खेचत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या शतकानंतर त्याने मैदानावर वेगळंच सेलिब्रेशन केलं. फरहानने बॅटला बंदूकीसारखं पकडत फायरिंग करत सेलिब्रेशन केलं. त्याच्या या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

साहिबजादा फरहानचे पॉवरप्लेमध्ये दोन वेळा झेल सुटले आणि याचा त्याने फायदा घेत अर्धशतकी खेळी करत मोठी खेळी रचली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात भारताविरूद्ध ५ बाद १७१ धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या सर्व फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, ज्यामुळे त्यांना भारताविरूद्ध चांगली कामगिरी करता आली. आता भारताला विजयासाठी १७२ धावांचं आव्हान देण्यात आलं आहे.