रांची कसोटी सामन्यात भारतीय संघाने ४९७ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात अतिशय खराब सुरुवात झाली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यापुढे आफ्रिकेचा निम्मा संघ गारद झाला आहे. रांची कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहबाज नदीमने या सामन्यात पहिला बळी घेतला आहे.
शाहबाज नदीमने दक्षिण आफ्रिकेचा उप-कर्णधार टेम्बा बावुमाला यष्टीचीत करत माघारी धाडलं. पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात नदीमचा वळलेला चेंडू बावुमाला कळला नाही. यावेळी यष्टीरक्षक साहाने क्षणाचाही विलंब न करताना बावुमाला यष्टीचीत केलं. कसोटी कारकिर्दीत आपली पहिली विकेट यष्टीचीत स्वरुपात घेणारा नदीम चौथा गोलंदाज ठरला आहे.
- डब्ल्यू.व्ही.रमन – १९८७/८८
- एम. वेंकटरमन – १९८८/८९
- आशिष कपूर – १९९४/९५
- शाहबाद नदीम – २०१९/२०
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले आफ्रिकेचे सलामीवीर झटपट माघारी परतले होते. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला कर्णधार फाफ डु-प्लेसिसही उमेश यादवच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतला. यानंतर टेम्बा बावुमा आणि झुबेर हमजा यांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. अखेरीस नदीमने बावुमाला माघारी धाडत आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली.
३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.