दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून प्रथमच खेळणाऱ्या रोहित शर्माने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. पहिल्या डावात दीडशतकी खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करत शतक ठोकले. त्यानंतर चहुबाजूने रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. क्रिकेट विश्वातील केवळ पुरूष क्रिकेटपटूंनीच नव्हे, तर महिला क्रिकेटपटूंनीही त्याला शुभेच्छा दिल्या. इंग्लिश क्रिकेटपटू डॅनिअस वॅट हिने रोहितचे कौतुक केले.

रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यानुसार त्याने दोनही डावात मिळून ३०३ धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

रोहितच्या या खेळीची भुरळ इंग्लंडची ‘बोल्ड अँड ब्युटिफुल’ महिला क्रिकेटपटू डॅनी वॅट हिलाही पडली. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रोहितचा फोटो शेअर केला आणि रोहितच्या खेळीची कौतुक केले.

दरम्यान, “कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून मला संधी दिली, त्यासाठी मी साऱ्यांचे आभार मानतो. मी प्रथमच सलामीला आलो हे जरी बरोबर असले तरी माझे लक्ष हे त्याकडे नव्हते. मी सामना जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले होते. दोन वर्षांपूर्वीपासून मी कसोटीतही सलामीला फलंदाजीसाठी यावे अशी चर्चा होती. त्यामुळे मी जेव्हा कसोटी क्रिकेट खेळत नव्हतो, तेव्हादेखील मी कसोटीसाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या चेंडूने नेट्समध्ये सराव करायचो. त्याचाच मला फायदा झाला”, असे रोहितने सलामीला यशस्वी ठरल्यामागचे कारण सांगितले.