ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध झालेल्या पराभवाची निराशा दूर ठेवत भारत ‘अ’ संघ येथे सुरू असलेल्या तीन संघांच्या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध विजय मिळविण्याबाबत आशावादी आहे. हा सामना रविवारी येथे होणार आहे.
पहिल्या सामन्यात भारतास ११९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारताच्या धवल कुलकर्णी व संदीप शर्मा या वेगवान गोलंदाजांनी कांगारूंच्या उस्मान ख्वाजा व जो बर्न्‍स यांना सुरुवातीला फटकेबाजीबाबत स्वातंत्र्य दिले नाही. मात्र स्थिरावल्यानंतर ख्वाजा व बर्न्‍स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळेच की काय येथे शनिवारी सरावाच्या वेळी द्रविड यांनी भारतीय गोलंदाजांना यष्टीवर सातत्याने मारा करण्यास सांगितले.
फलंदाजीत कर्णधार उन्मुक्त चंद व केदार जाधव यांनी केलेल्या अर्धशतकांचा अपवाद वगळता एकही फलंदाज कांगारूंच्या प्रभावी माऱ्यापुढे फार वेळ टिकू शकला नव्हता. आफ्रिकेविरुद्ध भारताला फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने मयांक अगरवाल, मनीष तिवारी व करुण नायर यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
कर्णधार डीन एल्गार, थियुनिस ब्रुन व कॉडी चेटी यांच्यावरही आफ्रिकेच्या फलंदाजीची भिस्त आहे.