* जपानवर ६-१ असा दणदणीत विजय
* हरमनप्रीत सिंगचे दोन गोल
जपानवर ६-१ असा दणदणीत विजय मिळवत शनिवारी भारताने आशिया चषक कुमार हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
मनदीप सिंगने सामन्याच्या १२व्या मिनिटाला गोल करत भारताला खाते उघडून दिले. त्यानंतरच्याच मिनिटाला मनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी दुप्पट करून दिली. हरमनप्रीत सिंग आणि विक्रमजित सिंग यांनी अनुक्रमे २३ आणि २७व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी वाढवली. त्यानंतर ४४व्या मिनिटाला जपानच्या शोटा यमाडाने जपानसाठी एकमेव गोल केला.
हरमनप्रीतने सामन्याच्या ४८व्या मिनिटाला दुसरा गोल करून भारताला ५-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर वरुण कुमारने ६४व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आम्ही विजेतेपदापासून फक्त एका पावलाच्या अंतरावर आहोत. त्यामुळे आता शांत डोक्याने स्पध्रेकडे पाहण्याची गरज आहे. जेतेपदासाठी संघ आसुसला आहे. अंतिम सामन्याकडे फक्त एका सामन्याच्याच दृष्टीकोनातून पाहू आणि अप्रतिम कामगिरीसह जेतेपदजिंकू.
-हरेंद्र सिंग, भारताचे प्रशिक्षक