भारताचा २-० अशा फरकाने नेपाळवर विजय

मुंबई इंडियन्सचा आज कोणाशी सामना आहे? भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा पुढील सामना कधी आहे? विराट कोहलीने किती धावा केल्या? अश्विनने किती बळी मिळवले?.. हे प्रश्न मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी काही नवखे नाहीत. त्यामुळे मोबाइलवर कुणी सामन्याचे धावफलकही पाहत असले की त्याच्याभोवती गर्दी ही जमणे अपेक्षितच.. पण याच क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटेतर खेळ होतात, परंतु त्याची अशी चर्चा ओघानेच पाहायला मिळते. फिफाच्या जागतिक फुटबॉल क्रमवारीत १००व्या स्थानी झेप घेतलेला तोच भारतीय पुरुष फुटबॉल संघ गेली चार आठवडे मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलात कसून सराव करत आहे. मंगळवारी हा भारतीय संघ येथेच नेपाळविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढत खेळत आहे आणि याची साधी चर्चाही नाही. त्यामुळे काहीशा निराश चेहऱ्याने फुटबॉल मैदानावर लढत पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर अचानक स्मितहास्य फुलले. या लढतीची चर्चा नसली तरी प्रत्यक्ष स्टेडियमवर उपस्थितांनी दिलेल्या प्रतिसादाने भारताच्याच नव्हे तर नेपाळच्या खेळाडूंनाही हुरूप आला. ही लढत भारताने २-० अशी जिंकली, परंतु नेपाळच्या लढाऊ बाण्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. सामना संपल्यानंतर प्रेक्षकांनी नेपाळ संघाचे आभार मानले आणि टाळ्यांच्या कडकडाटासह त्यांचे प्रोत्साहन दिले.

फुटबॉल विश्वचषक (१७ वर्षांखालील) स्पध्रेच्या निमित्ताने भारतात जगातील सर्वाधिक पसंतीच्या अर्थात फुटबॉलचे वारे  वाहू लागले आहेत. त्यात भारतीय वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाने जागतिक क्रमवारीत घेतलेल्या अनपेक्षित मुसंडीने या खेळाकडे अनेकांना आकर्षित केले आहे. ‘स्लिपिंग जायंट’ अशी ओळख असलेल्या भारताने गेल्या काही वर्षांत फुटबॉलमध्ये चांगली प्रगती केली आहे. त्याला पोचपावती म्हणून भारत आणि नेपाळ यांच्यात खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रेक्षकांनी बऱ्यापैकी गर्दी केली होती. क्रिकेटच्या पंढरीत फुटबॉलला अशी गर्दी लाभणे म्हणजे खरे तर आश्चर्यच म्हणावे लागेल, परंतु हे बदलाचे वारे आहेत. भारताचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टन्टाईन यांनीही तसे मत व्यक्त केले.

कमाईचा उकाडा होत असतानाही फुटबॉलच्या या वाऱ्याने चाहत्यांना सुखद गारव्याचा अनुभव दिला. पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनी चेंडूवर हुकमत गाजवताना एकामागून एक गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, परंतु रॉबीन सिंगने तीन संधी गमावल्याने पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी राहिली. पहिल्या सत्रातील अखेरच्या मिनिटाला नेपाळच्या सुजल श्रेष्ठाला गोल करण्याची संधी चालून आली होती. श्रेष्ठा आणि गोलजाळी यांच्यामध्ये गोलरक्षक गुरप्रित सिंग संधू होता, परंतु नेपाळच्या खेळाडूने ही संधी गमावली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. ६०व्या मिनिटाला संदेश जिंगमने अप्रतिम गोल करत भारताला १-० अशा आघाडीवर नेले. त्यानंतर ६८व्या मिनिटाला नेपाळचा कर्णधार बिराज महारजनला लाल कार्ड दाखवण्यात आले आणि नेपाळची बाजू कमकुवत झाली. त्याचा फायदा उचलत भारताला मोठय़ा फरकाने विजय मिळवणे सहज शक्य होते. मात्र नेपाळचा गोलरक्षक किरण कुमार लिम्बूची भिंत पार करण्यात यजमानांना अपयश आले. ७८व्या मिनिटाला जेजे लाल्पेखलुआने भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली आणि विजयही निश्चित केला. मात्र भारताच्या कामगिरीवर प्रशिक्षक कॉन्स्टन्टाईन हे फारसे समाधानी दिसले नाहीत. ‘‘भारताला बऱ्याच बाबतीत मेहनत घ्यावी लागेल,’’ असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यापूर्वी नेपाळविरुद्ध झालेल्या लढतीत भारताने ४-० असा विजय मिळवला होता आणि त्या तुलनेत ही कामगिरी नक्कीच समाधानकारक नाही.

आशियाई चषक पात्रता स्पध्रेपूर्वी या लढतीमुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. हा आमच्यासाठी चांगला अनुभव होता. आमच्याकडून अनेक चुका झाल्या आणि त्या सुधारण्याची संधी आम्हाला आहे.

कोजी गायटोको, नेपाळचे प्रशिक्षक

सराव सामन्यात आणि आशियाई पात्रता स्पध्रेतील लढतीत बराच फरक असतो. नेपाळविरुद्धच्या लढतीत २-० असा विजय वगळल्यास फार काही आनंद साजरा करण्यासारखे नाही. भारतीय खेळाडूंना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. आशियाई पात्रता स्पध्रेत किर्गिजस्थानविरुद्ध अधिक जोमाने खेळ करावा लागेल.

स्टिफन कॉन्स्टन्टाईन, भारताचे प्रशिक्षक