भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघ आयोजित ‘मि. वर्ल्ड’ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच सारेच नजाकतभऱ्या अदाकारींनी मंत्रमुग्ध झाले. पहिल्या दिवशीच भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी जबरदस्त कामगिरी करत पाच पदकांनिशी सलामी दिली. यामध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. पुरुषांमध्ये नेंद्रो येंद्रेमबमने आणि नीलेश बोम्बले यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली तर महिलांमध्ये श्वेता राठोरने कांस्यपदकाची कमाई केली.
पहिल्याच दिवशी भारताला पाच पदके मिळतील, अशी अपेक्षा नव्हती. पण भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी दिमाखदार कामगिरी करत पाच पदके पटकावली. ज्येष्ठ पुरुषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत ६१ वर्षीय नंदोने सुवर्णपदक पटकावत भारताला पदकांची बोहनी करून दिली. या गटामध्येच राजेंद्र सक्सेनाने रौप्यपदक पटकावले.
पुरुषांच्या क्रीडा फिजिक प्रकारामध्ये भारताच्या नीलेश बोम्बलेने सुवर्णपदक पटकावत साऱ्यांनाच थक्क करून सोडले, याच विभागामध्ये मिहीर सिंगने कांस्यपदक पटकावले. महिलांच्या फिटनेस फिजिक प्रकारामध्ये श्वेताने अप्रतिम प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावत भारताला अभूतपूर्व यश मिळवून दिले.
जागतिक शरीरसौष्ठव स्पध्रेत महिलांच्या गटात भारताच्या श्वेता राठोरने (उजवीकडून पहिली) कांस्यपदकाची कमाई केली.