महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीखाली भारतीय युवा सेना न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे ती विजयाची पताका मिरवण्यासाठीच. कारण दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारताने विजयाचा दुष्काळ अनुभवला, एकाही सामन्यात भारताला विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे न्यूझीलंडचा सध्याचा दौरा भारतीय संघासाठी परदेशातील कामगिरी उंचावण्यासाठी महत्त्वाचा असेल. आफ्रिकेमध्ये भारतीय संघाची त्रेधा उडाली होती, वस्त्रहरण झाले होते. त्यामुळे गेलेली वस्त्रे मिळवण्यासाठी भारताकडे ही नामी संधी असेल. कारण आफ्रिकेच्या संघाएवढा न्यूझीलंडचा संघ बलवान वाटत नाही आणि त्याचाच फायदा भारतीय संघ उचलण्याच्या तयारीत असेल.  विश्वचषकाच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्वाची असून प्रतिस्पध्र्याबरोबर  त्यांना वाऱ्याशीही झुंजावे लागणार आहे. एकिकडे रविवारपासून सुरू होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नशील असेल, तर दुसरीकडे मायदेशात दमदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडच्या संघापुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान असेल.
भारतामध्ये धावांची टांकसाळ उघडणाऱ्या भारतीय फलंदाजांची बोलती दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय मालिकेत बंद झाली होती. त्यामुळे न्यूझीलंडच्या एकदिवसीय मालिका त्यांच्यासाठी आव्हान असेल. रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांना आफ्रिकेच्या दौऱ्यात काहीही करता आले नव्हते. त्याचबरोबर विराट कोहली आणि सुरेश रैना यांनाही आपली छाप पाडता आली नव्हती. हे सारे फलंदाज आगामी विश्वचषकात असण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असेल. धोनीलाही न्यूझीलंडचा जास्त अनुभव नसल्याने त्याच्यासाठीही हा कसोटीचा काळ असेल. अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी या नवोदितांना या दौऱ्यात संधी मिळणार की ते या दौऱ्यावर पर्यटक ठरणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रवींद्र जडेजासारखा अष्टपैलू संघात असला तरी त्याच्याकडून फलंदाजीच्या अपेक्षा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शामी आणि भुवनेश्वर कुमार या दोन्ही युवा वेगवान गोलंदाजांवर भारतीय संघाची मदार असेल. इशांत शर्मा, आर. अश्विन यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल. न्यूझीलंडच्या संघाने गेल्या मालिकेत दमदार कामगिरी केली होती, त्याचबरोबर मायदेशातील गेल्या सहा एकदिवसीय मालिकेत त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे. त्यामुळे भारताविरुद्ध खेळताना त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. कर्णधार ब्रेन्डन मॅकक्युलम, रॉस टेलर, जेसी रायडर, मार्टीन गप्तील यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. तर गेल्या मालिकेत सर्वात जलद शतक ठोकण्याचा विश्वविक्रम रचणाऱ्या कोरे अँडरसनकडून अपेक्षा उंचावलेल्या असतील.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे, वरुण आरोन आणि अमित मिश्रा.
न्यूझीलंड : ब्रेन्डन मॅकक्युलम (कर्णधार), कोरे अँडरसन, मार्टीन गप्तील, मिचेल मॅक्लेघन, नॅथन मॅकक्युलम, कायले मिल्स, अ‍ॅडम मिल्ने, जेम्स नीशाम, ल्यूक राँची (यष्टीरक्षक), जेसी रायडर, टीम साऊथी, रॉस टेलर आणि केन विल्यमसन.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनीवर.
*सामन्याची वेळ : सकाळी ६.३० वा. पासून.