भाारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या कसोटीला उद्या गॅलेच्या मैदानात सुरुवात होईल. मोठ्या कालावधीनंतर भारताचा हा पहिला परदेश दौरा असणार आहे. त्यातच भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी कर्णधार विराट कोहलीचे झालेले वाद, यामुळे भारतीय संघावर सध्या भारतीय चाहत्यांची खप्पामर्जी आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय संघाला चांगली कामगिरी करणं हे अत्यंत गरजेचं बनलं आहे. मात्र रविचंद्रन अश्विनसाठी ही कसोटी एका अर्थाने अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आपल्या कारकिर्दीतली ५० वी कसोटी आश्विन उद्या खेळणार आहे. यावेळी आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आश्विनने काही पत्रकारांशी संवाद साधला.
“२०१५ साली मी ज्या ठिकाणी चांगली कामगिरी केली, त्याच जागी आज ५० वी कसोटी खेळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळात, मी प्रचंड आक्रमक होतो, प्रत्येक सामन्यात माझी कामगिरी चांगलीच व्हायला हवी असा माझा आग्रह असायचा. मात्र आता मी बऱ्याच प्रमाणात शांत झालोय. गेल्या काही वर्षांमध्ये मी माझ्या कामगिरीतून धडे घेत एक परिपक्व क्रिकेटपटू झालो आहे”.
२०११ साली रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं. आतापर्यंत गोलंदाजीप्रमाणे अश्विनने फलंदाजीतही चमक दाखवली आहे. ४९ कसोटी सामन्यांमध्ये अश्विनने आतापर्यंत १९०३ धावा केल्या आहेत. आतापर्यंत आश्विनच्या खात्यात २७५ विकेट जमा आहेत, त्यामुळे या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत अश्विनला ३०० विकेटचा टप्पा ओलांडण्याची चांगली सुवर्णसंधी मिळणार आहे. फेब्रुवारीत भारतात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अश्विन सर्वात जलद २५० विकेट घेणारा कसोटी गोलंदाज ठरला होता.
आतापर्यंत कसोटीत भारताचा संघ कौतकास्पद कामगिरी करत असल्याचं अश्विनने म्हणलंय. रविंद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा सारखे खेळाडू आपल्या खेळाच्या आधारावर संघात आपली जागा कायम ठेऊन आहेत. कित्येकवेळा अनेक चांगल्या खेळाडूंना संघात सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू असल्यामुळे जागा गमवावी लागली आहे, माझ्या दृष्टीने ही सर्वात चांगली गोष्ट असल्याचं अश्विनने म्हणलं आहे.