आयपीएल २०२१पूर्वी क्रिकेट चाहत्यांना कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) ही क्रिकेट लीग पाहता येणार आहे. जगभरातील स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळतात, मात्र आता वर्ल्डकप जिंकलेल्या स्टार भारतीय खेळाडूचा यंदाच्या लीगमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे भारतीयांसाठीसुद्धा ही स्पर्धा महत्त्वाची ठरेल. सीपीएल येत्या २८ ऑगस्टपासून सुरू होणार असून अंतिम सामना १९ सप्टेंबरला होणार आहे. सीपीएलच्या आधी वेस्ट इंडिजचा संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध १५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणार आहे. ख्रिस गेल, शाकिब अल हसन, फाफ डू प्लेसीस, ख्रिस मॉरिस आणि इम्रान ताहिर हे परदेशी स्टार खेळाडूही या लीगमध्ये खेळताना दिसतील.

स्मित पटेल

 

सीपीएलमध्ये फक्त एक भारतीय खेळाडू

भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला स्मित पटेल यावेळी सीपीएलमध्ये बार्बाडोस ट्रायडंट्सकडून खेळताना दिसणार आहे. स्मित २०१२ला झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. पटेलने अंतिम सामन्यात नाबाद ६२ धावा फटकावल्या आणि कर्णधार उन्मुक्त चंद याच्याबरोबर शतकी भागीदारी केली, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून पराभूत केले. घरगुती क्रिकेटमध्ये स्मित पटेल गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि बडोदाकडून खेळला आहे. यावर्षी बडोद्याकडून पटेलने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही भाग घेतला होता. पटेलने २८ टी-२० सामन्यात चार अर्धशतकांच्या मदतीने ७०८ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने २४ बळीही घेतले आहेत.

हेही वाचा – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महामुकाबल्यासाठी इंग्लंडला जाणार दिनेश कार्तिक!

सीपीएलमध्ये खेळणार १०१ खेळाडू

सीपीएल २०२१मध्ये ३३ सामने खेळले जातील आणि सर्व सामने सेंट किट्स आणि नेव्हिसमधील वॉर्नर पार्क येथे खेळले जातील. सीपीएलच्या सहा संघांनी त्यांच्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या वेळी या स्पर्धेत १०१ खेळाडू खेळताना दिसतील. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर पहिल्यांदा सीपीएलमध्ये भाग घेईल. तोसुद्धा बार्बाडोस ट्रायडंट्सकडून खेळताना दिसणार आहे.