दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ न्यूझीलंड भूमीवरही पराभवाने भारताचा पिच्छा पुरवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवामुळे भारताला जागतिक एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीमधील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतील अपयश तसेच पावसाचा फटका यामुळे भारताने या सामन्यात १५ धावांनी हार पत्करली. आता पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने २-० अशी आघाडी घेतली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील अग्रस्थान टिकवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक होता. या परिस्थितीत भारताला विजयासाठी ४२ षटकांत २९७ धावांचे सुधारित आव्हान समोर ठेवण्यात आले, परंतु भारताला ४१.३ षटकांत २७७ धावाच करता आल्या आणि पाऊस पुन्हा कोसळला. या वेळी ४१.३ षटकांत भारताला २९३ धावांचे लक्ष्य होते.
भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. किवी संघाने ७ बाद २७१ धावा केल्या. केन विल्यम्सनने सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय देत ७६ धावा केल्या, तर अष्टपैलू कोरे अँडरसन याने आणखी एक धडाकेबाज खेळी साकारताना पाच उत्तुंग षटकारांनिशी १७ चेंडूंत ४४ धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययानंतर यजमानांनी ८.४ षटकांत १०१ धावा केल्या. त्यामुळे डकवर्थ-लुइस नियमानुसार भारतापुढे २९७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
त्यानंतर शिखर धवनने २२ चेंडूंत १२ आणि रोहित शर्माने ३४ चेंडूंत २० धावा काढून तंबूची वाट पकडली. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यामुळे भारताला चांगली सलामी मिळू शकली नाही. पण पहिल्या एकदिवसीय सामन्यात झुंजार शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीने सर्वाधिक ७८ धावा केल्या. याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनी (५६), सुरेश रैना (३५), अजिंक्य रहाणे (३६) यांनी आशादायी फलंदाजी केली, परंतु सामना जिंकून देणाऱ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले.
न्यूझीलंडकडून टिम साऊदीने भारताच्या आघाडीच्या फळीला हादरे देण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना ७२ धावांत ४ बळी घेतले. तथापि, अँडरसनने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करताना ६७ धावांत धोनी, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांना तंबूची वाट दाखवली.
या पराभवामुळे एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिरावून घेतले आहे. २०११मध्ये इंग्लंडकडून ०-४ अशा फरकाने सपाटून मार खाल्ल्यामुळे भारताला कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले होते.
धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गप्तिल झे. शमी गो. रैना ४४, जेसी रायडर झे. धोनी गो. शमी २०, केन विल्यम्सन यष्टीचीत धोनी गो. जडेजा ७७, रॉस टेलर झे. धोनी गो. शमी ५७, कोरे अँडरसन झे. आणि गो. शमी ४४, ब्रेन्डन मॅक् क्युलम ०, ल्युक रोन्ची नाबाद १८, नॅथन मॅक् क्युलम त्रिफळा गो. कुमार १, कायले मिल्स नाबाद २, अवांतर (लेगबाइज १, वाइड ७) ८, एकूण ४२ षटकांत ७ बाद २७१.
बाद क्रम : १-२५, २-११४, ३-१७४, ४-२४८, ५-२५०, ६-२५१, ७-२५२.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-१-४३-१, मोहम्मद शमी ७-०-५५-३, इशांत शर्मा ६-०-४६-१, रवींद्र जडेजा ८-०-४६-१, विराट कोहली २-०-१२-०, आर. अश्विन ८-०-५०-०, सुरेश रैना ४-०-१८-१.
भारत : (२९३ धावांचे लक्ष्य) शिखर धवन त्रिफळा गो. साऊदी १२, रोहित शर्मा झे. रोन्ची गो. साऊदी २०, विराट कोहली झे. बदली खेळाडू (एपी डेव्हसिच) गो. साऊदी ७८, अजिंक्य रहाणे झे. रोन्ची गो. मॅक् क्लिनॅघन ३६, महेंद्रसिंग धोनी झे. विल्यम्सन गो. अँडरसन ५६, सुरेश रैना झे. साऊदी गो. मिल्स ३५, रवींद्र जडेजा त्रिफळा गो. अँडरसन १२, आर. अश्विन झे. गप्तिल गो. साऊदी ५, भुवनेश्वर कुमार झे. नॅथन मॅक् क्युलम गो. अँडरसन ११, मोहम्मद शमी नाबाद १, इशांत शर्मा १, अवांतर (लेगबाइज ३, वाइड ७) १०, एकूण ४१.३ षटकांत ९ बाद २७७.
बाद क्रम : १-२२, २-३७, ३-१२७, ४-१६४, ५-२२६, ६-२५७, ७-२५९, ८-२६५, ९-२७५.
गोलंदाजी : कायले मिल्स ९-१-५०-१, मिचेल
मॅक् क्लिनॅघन ८-१-४५-१, टिम साऊदी ९-०-७२-४, नॅथन मॅक् क्युलम ८-०-४०-०, कोरे अँडरसन ७.३-०-६७-३.
सामनावीर : केन विल्यम्सन.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2014 रोजी प्रकाशित
अग्रस्थान खालसा! दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा १५ धावांनी विजय
दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ न्यूझीलंड भूमीवरही पराभवाने भारताचा पिच्छा पुरवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवामुळे भारताला जागतिक एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीमधील अव्वल स्थान गमवावे लागले आहे.
First published on: 23-01-2014 at 01:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs new zealand second oneday live score