Sunil Gavaskar on India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात दुबई येथे सुपर ४ फेरीतील दुसरा सामना रविवारी (२१ सप्टेंबर) पार पडला. भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानला लाजिरवाणा परभव दिला. ६ विकेट्सने भारताने सहज विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने केवळ १८.५ षटकात गाठले. दरम्यान या सामन्यात सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पाकिस्तानी गोलंदाजाची सर्वार्थाने धुलाई केली. तसेच भारतीय खेळाडूंनीही काही चुका केल्या. यावर आता सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानविरोधात आशिया चषकात दुसरा विजय मिळवला असला तरी भारताने क्षेत्ररक्षणादरम्यान केलेल्या चुकांचीही चर्चा होत आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल चार कॅचेस भारतीय खेळाडूंनी सोडल्या होत्या. तसेच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळवता आली नाही. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी एका गोलंदाजावर नाराजी व्यक्त केली.
सुनील गावसकर यांनी अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला प्रश्न विचारला आहे. पाकिस्तानी फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत असताना लय पकडली होती. तसेच कॅचेस ड्रॉप झाल्यामुळे काहीसा तणाव फिल्डवर होता. अशात कर्णधार सूर्यकुमारने ११ वे षटक शिवम दुबेला दिले. या षटकात शिवम दुबेने सैम अयुबला चालते केले. दुबेचा चेंडू अयुबला कळला नाही आणि अभिषेक शर्माने जबरदस्त कॅच घेतली. दुबेमुळे अयुब आणि साहिबझादा फरहान यांची जोडी फुटली.
सुनील गावसकर काय म्हणाले?
दुबेने पहिल्याच षटकात विकेट घेतल्यानंतर दोन चेंडूनंतर लगेचच नो बॉल टाकला. यावर सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “तुम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहात, तुम्हाला असे करता येणार नाही. तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे.”
भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करत असताना चार कॅचेस सोडल्या. अभिषेक शर्माने सैम अयुबची शानदार कॅच घेतली असली तरी त्याच्याकडून दोनदा कॅच सोडला. शुबमन गिलनेही एक साधारण कॅच सोडला. फरहानला दोन वेळा जीवनदान मिळाल्यानंतर त्याने ४५ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. ज्यात पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
शिवम दुबेची कामगिरी
दरम्यान, शिवम दुबेने या सामन्यात आपल्या गोलंदाजीने अनेकांना आश्चर्यचकीत केले. दुबेने दोन विकेट घेत चार षटकात ३३ धावा दिल्या. धोकादायक वाटणाऱ्या फरहानची विकेटही त्यानेच मिळवली. बुमराह आणि इतर गोलंदाज सुरुवातीला विकेटसाठी चाचपडत असताना शिवम दुबेने मिळवलेल्या दोन विकेट महत्त्वपूर्ण ठरल्या.