सेंच्युरियन : भारतीय फलंदाजांकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. गेल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांना चमक दाखवता आली नव्हती. भारताने सेंच्युरियनमध्ये २००९ नंतर केवळ एकच ट्वेन्टी-२० सामना खेळला आहे आणि २०१८ मध्ये झालेल्या या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले होते. त्या संघातील केवळ हार्दिक पंड्या सध्याच्या संघात आहे. त्यामुळे भारताला मालिकेत आघाडी मिळवायची झाल्यास फलंदाजांना कामगिरी उंचावण्याशिवाय पर्याय नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने गेल्या सामन्यात विजय नोंदवत मालिकेत बरोबरी साधली. यजमानांचा कर्णधार एडीन मार्करम, डेव्हिड मिलर व हेन्रिक क्लासन यांना अजूनपर्यंत आक्रमक खेळ करता आलेला नाही. गेल्या सामन्यात ट्रिस्टन स्टब्स आणि गेराल्ड कोएट्झी यांनी निर्णायक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यातही संघाला त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे. मात्र, संघाला मालिकेत आघाडी घ्यायची झाल्यास अनुभवी फलंदाजांना आणखी जबाबदारीने खेळावे लागेल. गोलंदाजीतही मार्को यान्सन, केशव महाराजकडून संघाला अपेक्षा असतील.

चक्रवर्तीवर गोलंदाजीची मदार

आतापर्यंतच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या सामन्यात तीन व गेल्या सामन्यात पाच गडी बाद करत त्यांनी संघाची निर्णायक भूमिका पार पाडली आहे. त्याला रवि बिश्नोईचीही (एकूण ४ बळी) चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे मालिकेत आघाडी घ्यायची झाल्यास या दोन फिरकीपटूंना पुन्हा एकदा चमक दाखवावी लागेल. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गेल्या सामन्यात निराश केले. चक्रवर्तीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला होता. मात्र, त्याची षटके संपल्यानंतर स्टब्स व कोएट्झीने अर्शदीपच्या गोलंदाजीवर धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात अर्शदीपला यामध्ये सुधारणा करावी लागेल. नाहीतर संघाकडे यश दयाल व वैशाक विजयकुमार यांचे पर्याय आहेत.

● वेळ : रात्री ८.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.

अभिषेक, सॅमसनवर नजर

फलंदाजांची लय ही भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. सुपरस्पोर्ट पार्कची खेळपट्टी ही ग्वेबेऱ्हाच्या खेळपट्टीप्रमाणे वेगवान गोलंदाजांना पूरक आहे. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांना आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी अडचणीत आणले होते. त्यामुळे भारताला १२४ धावसंख्येपर्यंत पोहोचता आले होते. अभिषेक शर्माने सातत्याने निराश केले आहे. त्यामुळे संघातील स्थान कायम राखायचे झाल्यास त्याला या सामन्यात चमक दाखवावी लागेल. संघ व्यवस्थापन संजू सॅमसनसह तिलक शर्माला सलामीला पाठवू शकते. तर, रमनदीप सिंगला मध्यक्रमात संधी देऊ शकते. कर्णधार सूर्यकुमार, पंड्या व रिंकू सिंह यांनाही योगदान द्यावे लागेल. पंड्याने दुसऱ्या सामन्यात ३९ धावा केल्या होत्या. भारताला या सामन्यात विजय नोंदवायचा झाल्यास सॅमसनसह सर्व फलंदाजांना एकत्रित कामगिरी उंचवावी लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs south africa 3rd t20i match india eye batting revival against sa at centurion zws