IND Vs NZ : ICC चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताने आपलं नाव कोरलं आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट संघावर टीम इंडियाने चार गडी राखून विजय मिळवला आहे. रोहित शर्माची जबरदस्त खेळी, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, के. एल. राहुल यांच्या जबरदस्त आणि संयत खेळीने टीम इंडियाला विजयाचं लक्ष्य गाठता आलं. सुरुवातीला नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय फिरकी गोलंदाजाच्या माऱ्यापुढे त्यांना फक्त २५१ धावाच करता आल्या. हे लक्ष्य भारताने ४९ षटकांत गाठलंं.
१५ ऑक्टोबर २००० ला काय घडलं होतं?
१५ ऑक्टोबर २००० या दिवशी भारत आणि न्यूझीलंड हे दोन देश आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यांत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. नैरोबी या ठिकाणी हा सामना पार पडला होता. सौरभ गांगुली तेव्हा टीम इंडियाचा कप्तान होता. त्या सामन्यात सौरभ गांगुलीने ११९ धावा केल्या तर सचिन तेंडुलकरने ६९ धावा केल्या होत्या. भारताने न्यूझीलंडविरोधात २६४ धावा करत त्यांना २६५ धावांचं लक्ष्य दिलं होतं.
न्यूझीलंडची बॅटिंग सुरु झाली आणि पाच विकेट गेल्या
नैरोबीला झालेल्या या सामन्यात गोलंदाजांनीही कमाल केली होती. क्रेग स्पिअरमनला २ धावांवर तर त्यावेळी कॅप्टन असलेल्या स्टीफन फ्लेमिंगला ५ धावांवार व्यंकटेश प्रसादने आऊट केलं. स्कोअर बोर्डवर १३२ धावा झळकेपर्यंत न्यूझीलंडचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. मात्र ऑलराऊंडर ख्रिस केयन्स आणि क्रिस हॅरीस यांनी १४८ धावांची पार्टनरशिप करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. हॅरीसने नाबाद १०२ धावांची खेळी केली तर केयन्सने ४६ धावा केल्या. न्यूझीलंडने आयसीसीटीची स्पर्धा जिंकून चॅम्पियन होण्याची ती पहिलीच वेळ होती. भारताने सामना गमावाला होता. ज्यामुळे अवघा देश हळहळा होता. आज त्या सामन्याची आठवण अनेकांना झाली आहे. किवींना पराभवाची धूळ चारत भारतीय क्रिकेट संघाने म्हणजेच रोहित सेनेने किवींवर विजय मिळवला आहे.
अटीतटीचा आणि तेवढाच रोमहर्षक सामना
न्यूझीलंडने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी करत संघाच्या विजयाच्या पाया रचला. रोहित शर्माने ८३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावा केल्या, तर शुबमन गिलने ५० चेंडूत एका षटकारासह ३१ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या भागीदारीने भारताला सामन्यात कायम ठेवलं. श्रेयस अय्यर ६२ चेंडूत २ चौकार २ षटकारांसह ४८ धावा करत बाद झाला. तर अक्षर पटेलने ४० चेंडूत १ चौकार १ षटकारासह २९ धावा करत बाद झाला. तर राहुल आणि हार्दिकने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तर रवींद्र जडेजाने विजयी चौकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताने सुरुवात खूप चांगली केली होती. मात्र शुबमन गिलची विकेट गेल्यावर लगेचच विराट कोहलीची विकेट गेली. त्यामुळे सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. मात्र पुढच्या फळीने भारतीय संघाला विजयाचं लक्ष्य गाठून दिलं.
© IE Online Media Services (P) Ltd