नवी दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॉक्सर मेरी कोम हिने ४८ किलो वजनी गटात विजेतेपद मिळवले होते. या विजेतेपदाबरोबर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम तिने केला होता. त्यानंतर सुपरमॉम मेरी कोम हिने भारतीयांना अभिमान वाटावी अशी आणखी एक कामगिरी केली आहे. मेरी कोम हिने जागितक बॉक्सिंग क्रमवारीत (AIBA) अव्वल स्थान पटकावले आहे.

कामगिरीत सातत्य राखल्यामुळे मेरी कोम हिने हा सन्मान मिळवला आहे. मेरीसाठी २०१८ हे साल खूपच फलदायी ठरले. राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा अशा दोनही स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले होते. तिच्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर तिला नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्रमवारीत ७०० गुणांसह ४८ किलो वजनी गटातील अव्वल स्थान मिळाले आहे. मात्र २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी मेरी कोम हिला ५१ किलो वजनी गटातून खेळावे लागणार आहे. कारण ४८ किलो वजनी गट अद्याप २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही.

याशिवाय, भारताच्या पिंकी जांगरा हिने ५१ किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर आशियाई खेळात रौप्य पदक मिळवणाऱ्या मनीषा मौन हिने ५४ किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर, सोनिया लाथर हिने ५७ किलो वजनी गटात दुसरे स्थान पटकावले आहे.