वृत्तसंस्था, पीटीआय : भारताच्या एचएस प्रणॉयची इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमधील विजयी घोडदौड शनिवारी चीनच्या झाओ जून पेंगने सरळ गेममधील विजयासह उपांत्य फेरीत रोखली. जागतिक क्रमवारीत २३व्या क्रमांकावरील प्रणॉयने जागतिक कनिष्ठ स्पर्धेतील दोन कांस्यपदक विजेत्या पेंगकडून १६-२१, १५-२१ असा ४० मिनिटांत पराभव पत्करला. प्रणॉयची पेंगशी प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गाठ पडली होती. तो दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरला. याआधी २०१७मध्ये त्याने ही किमया साधली होती.

डावखुऱ्या पेंगने ताकदीच्या स्मॅशेसच्या बळावर पहिल्या गेममधील पहिल्या विश्रांतीला ११-६ अशी आघाडी मिळवली. मग त्याने १४-९ अशी आघाडी मिळवली. प्रणॉयने खेळ सुधारत रॅलीजमध्ये वेग आणत हे अंतर १४-१६ असे कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पेंगने पुन्हा मुसंडी मारत १९-१६ अशी आगेकूच केली आणि नंतर गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत ६-४ अशी आघाडी मिळवली. परंतु ही आघाडी त्याला फार काळ टिकवता आली नाही. पेंगने विश्रांतीला चार गुणांची आघाडी मिळवली. प्रणॉयने पंचांकडे चित्रफितीद्वारे दाद गमावली, तेव्हा पेंग १७-९ असा आघाडीवर होता. मग पेंगच्या चुकीमुळे प्रणॉयला परतीची संधी मिळाली. परंतु पेंगने दुसऱ्या गेमसह सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.