ज्वाला-अश्विनी, मनू-सुमीत जोडीचा पराभव
भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मात्र महिला दुहेरी प्रकारात ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा तसेच पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमीत रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आले.
या स्पर्धेची तीन जेतेपदे नावावर असणाऱ्या सायनाने इंडोनेशियाच्या फितिरिआनी फितरिआनीवर २१-११, २१-१० असा विजय मिळवला. एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायनाने फितरिआनीवर मात केली होती. पहिल्या गेममध्ये सायनाने ९-७ अशी आघाडी घेतली. सलग सहा गुणांसह सायनाने ही आघाडी १४-७ अशी वाढवली. सातत्याने आघाडी वाढवत सायनाने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये झंझावाती खेळ करत सायनाने १०-३ अशी दमदार आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावर सायनाने दुसऱ्या गेमसह सामना जिंकला.
चीनच्या ह्य़ुआंग याक्विआंग आणि तांग जिन्हुआ जोडीने ज्वाला-अश्विनी जोडीवर २१-९, २१-१८ अशी मात केली. कोरियाच्या को स्युंग ह्य़ुआन आणि शिन बेइक चेऑल जोडीने मनू आणि सुमीत जोडीवर २१-१८, २१-१३ असा विजय मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indonesia open saina nehwal sails to quarters