Jemimah Rodrigues Spirit of Sportsmanship: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाच्या खेळाडूंच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली. पाकिस्तान महिला संघाविरुद्धच्या स्पर्धेतील सहाव्या सामन्यात, टीम इंडियाच्या खेळाडूंनी खिलाडूवृत्ती काय असते, हे दाखवून दिलं.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या ३४ व्या षटकात, टीम इंडियाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय खेळभावना दाखवली. रमीन शमीमने टाकलेल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, दीप्ती शर्माने मिडविकेटकडे शॉट मारला आणि धाव घेण्यासाठी वेगाने धावली. दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने धावबाद होऊ नये म्हणून पटकन डाईव्ह मारली.

यादरम्यान, एका पाकिस्तानी खेळाडूने चेंडू जेमिमाच्या दिशेने फेकला, जो तिच्या बॅटवर लागला आणि थेट दुसऱ्या बाजूला गेला. जेमिमाला आणखी एक धाव घेण्याची संधी होती, परंतु खिलाडूवृत्तीच्या भावनेने तिने धाव न घेण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, सर्वांना बेन स्टोक्सची कृती आठवली, ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ विश्वचषक जिंकू शकला नाही.

जेमिमा बाद होऊनही राहिली नाबाद

भारतीय डावाच्या २७ व्या षटकातील तिसरा चेंडू जेमिमा रॉड्रिग्जच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये गेला, ज्यामुळे पाकिस्तान संघाकडून जोरदार अपील केलं. पंचांनी बाद झाल्याचा इशारा केला आणि पाकिस्तान संघाने आनंद साजरा करायला सुरुवात केली. जेमिमा देखील पॅव्हेलियनमध्ये परतण्यासाठी वळली. तितक्यात नो-बॉल सायरन वाजला आणि पाकिस्तानी खेळाडूंचे चेहरे पूर्णपणे पडले.

पंचांनी नो-बॉलचा संकेत देऊन जेमिमाला मैदानावर परतण्यास सांगितलं. यासह जेमिमाला एक जीवदान मिळालं. त्यावेळी रॉड्रिग्ज २ धावांवर फलंदाजी करत होती. जेमिमाने याचा फायदा घेत ३७ चेंडूत ३२ धावा केल्या. ज्यामुळे टीम इंडियाच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण भर घातली.