परुपल्ली कश्यपने नुकतीच जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंत झेप घेतली. दम्यासारख्या श्वसनाच्या गंभीर आजाराशी लढा देत कश्यपने सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या जोरावर हे अतुलनीय यश मिळवले. बॅडमिंटनसारख्या दमवणाऱ्या खेळात हा आजार कश्यपची कारकीर्द रोखू पाहत होता. मात्र योग्य औषधोपचार, आवश्यक काळजी आणि बॅडमिंटनप्रति अपार निष्ठा यांच्या जोरावर कश्यपने दम्यासारख्या आजारावर मात करून जगातल्या अव्वल दहा पुरुष खेळाडूंच्या मांदियाळीत स्थान पटकावले. जबरदस्त फॉर्मात असलेल्या कश्यपशी त्याचे यश, दुखापती, भविष्यातील योजना याविषयी केलेली बातचीत.
बॅडमिंटन हा शारीरिकदृष्टय़ा कसोटी पाहणारा खेळ आहे. दम्यासारख्या श्वसनाच्या आजाराने त्रस्त असताना तुला काय काळजी घ्यावी लागते?
माझा दम्याचा आजार पूर्णपणे बरा होणारा नाही. मला रोज औषध घ्यावेच लागते. औषधात एखाद्या दिवसाचा खंड पडला तरी पुन्हा त्रास सुरू होतो. नियमित औषधे घेत असल्याने मला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेच्या नियमांनुसार ठरावीक चाचण्यांना सामोरे जावे लागते. या चाचण्यांची यशस्वी पूर्तता केल्यानंतरच मला स्पर्धेत सहभागी होता येते. दम्याचा आजार बळावू नये, यासाठी मला आहाराची काळजी घ्यावी लागते. दम्याला पोषक म्हणजे धूळ, प्रदूषण असे वातावरण असेल तर मला विशेष काळजी घ्यावी लागते. छोटय़ाशा कारणामुळे दमा माझ्या खेळात अडथळा आणू शकतो, परंतु दम्यापेक्षा माझी जिद्द चिवट आहे.
क्रमवारीत अव्वल दहामध्ये समावेश झाल्यावर काय भावना होती?
प्रचंड आनंद झाला. प्रकाश पदुकोण यांनी अव्वल स्थान पटकावले होते. गोपीचंद आणि चेतन आनंद यांनी अव्वल पंधरा जणांमध्ये स्थान पटकावले होते. या तिघांनंतर मी हे स्थान पटकावल्याने समाधान वाटले. मात्र त्याच वेळी हे स्थान टिकवण्याची जबाबदारी असल्याची जाणीव झाली. अव्वल दहामध्ये प्रवेश करणे कठीण आहे, पण हे स्थान टिकवणे त्याहून कठीण आहे. हे स्थान टिकवण्यासाठी जबरदस्त शारीरिक तंदुरुस्ती आणि सातत्यपूर्ण प्रदर्शनाची आवश्यकता आहे.
ऑलिम्पिकवारीने तुझ्या खेळात आमूलाग्र बदल झाल्याचे जाणवते, त्याबाबत काय सांगशील?
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळाले ही अभिमानास्पद गोष्ट होती. ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा माझा निर्धार होता. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मी मजल मारली. ऑलिम्पिकवारीने जबरदस्त आत्मविश्वास मिळाला. क्रमवारी, प्रतिस्पर्धी खेळाडूची आपल्याविरुद्धची कामगिरी या सगळ्यापेक्षा सामन्याच्या विशिष्ट दिवशी आपण कसे खेळतो, याचे महत्त्व उमगले. यामुळे आता कोणत्याही अव्वल मानांकित खेळाडूविरुद्ध खेळण्याचे दडपण येत नाही.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तू सय्यद मोदी ग्रां. प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावलेस. ग्रां. प्रि. दर्जाच्या स्पर्धेचे तुझे हे पहिलेच जेतेपद. या यशाचे वर्णन कसे करशील?
दुखापतीमुळे या स्पर्धेआधीच्या हाँगकाँग आणि मकाऊ स्पर्धेत मी सहभागी होऊ  शकलो नाही. दुखापतीवर मात करत जेतेपद गाठण्याचे माझ्यासमोर आव्हान होते. स्पर्धेचे वेळापत्रक माझ्यासाठी खडतर होते. प्राथमिक फेरीपासून तगडय़ा खेळाडूंना नमवत मी अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत चुरशीच्या लढतीत थाई सेऊनबूनसुकला नमवत मी जेतेपदावर नाव कोरले. जेतेपदाचा करंडक उंचावला, त्या क्षणी झालेल्या आनंदाचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.
तुझ्या या सकारात्मक वाटचालीचे श्रेय कुणाला देशील?
माझी कारकीर्द घडवण्यात प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी माझ्या खेळातील कच्चे दुवे आणि बलस्थाने यांचा अभ्यास केला. प्रत्येक सामन्यानंतर, स्पर्धेनंतर ते माझ्या कामगिरीचा आढावा घेतात. आगामी स्पर्धासाठी डावपेचांमध्ये आवश्यक बदल सुचवतात. माझ्या दुखापती बळावणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांनी सरावाची आखणी केली आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक असल्यामुळे त्यांच्याकडे अन्य खेळाडूंकडे लक्ष देण्याची जबाबदारी असते. मात्र तरीही त्यांनी मला पुरेसा वेळ दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या अनुभवाचा मला प्रचंड फायदा झाला आहे. खेळ आणि वर्तनात शिस्तीचे संस्कार त्यांच्यामुळेच रुजले आहेत.
नवीन वर्षांत तुझे उद्दिष्ट काय आहे?
कामगिरीत सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुपर सीरिज दर्जाच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणे हे माझे लक्ष्य आहे. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धा तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने माझी तयारी सुरू आहे. या वर्षांत दुखापतींचे व्यवस्थापन करणेही माझ्यासाठी आवश्यक आहे.