मुंबईत रविवारी होणाऱ्या भारत-श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या सन्मानिकांवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) महत्त्वाचे पदाधिकारी आणि प्रशासकीय समिती यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला आहे.

बीसीसीआयच्या नियमावलीनुसार अध्यक्षांना विशेष तिकिटांसहित ५० सन्मानिका दिल्या जातात, तर सचिवांना ७५ आणि कोषाध्यक्षांना ७ सन्मानिका दिल्या जातात. परंतु प्रशासकीय समितीने काही महिन्यांपूर्वी प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना आणि प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांना पत्र लिहून प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आपल्या राखीव तिकिटांपैकी २५ सन्मानिका पुरस्कर्त्यांसाठी देण्याची विनंती केली होती. मात्र २४ डिसेंबरला होणाऱ्या सामन्याबाबत या संदर्भातील वाद निर्माण झाला आहे.

आम्ही सर्व पुरस्कर्त्यांपासून ते प्रक्षेपणकर्त्यांसाठी सन्मानिका राखून ठेवलेल्या आहेत. मग बिगरनावाचे असे कोणते पुरस्कर्ते आहेत, ज्यांना प्रशासकीय समिती सन्मानिका देत आहे, असा सवाल बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारला जात आहे. खन्ना यांनी प्रशासकीय समितीच्या विनंतीनुसार २५ सन्मानिका न देता स्वत:च्या वाटय़ाच्या ५० सन्मानिका ताब्यात घेतल्या.