ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे संयोजनपद केवळ एका शहराऐवजी दोन-तीन शहरांकडे देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतला आहे. एका शहराऐवजी दोन-तीन शहरांच्या एकत्रित प्रस्ताव पाठविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही नवीन क्रीडा प्रकारांचाही समावेश करण्याचा निर्णय आयओसीने घेतला आहे.
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी ऑलिम्पिक स्पर्धाच्या संयोजनाबाबत ४० सुधारणा सुचवल्या आहेत. ऑलिम्पिक संयोजनपदाच्या प्रस्तावाची प्रक्रिया अधिक आकर्षक व सुलभ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच स्पर्धेच्या खर्चात कपात करण्यावर त्यांनी भर दिला आहे. एका शहराला काही स्पर्धा घेणे शक्य नसल्यास काही स्पर्धा या शहराबरोबरच अन्य जवळच्या शहरांत घेण्यास मुभा देण्यात येणार आहे. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी काही क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा एक शहराऐवजी दोन-तीन शहरांमध्ये आयोजित केल्या जातात.
संयोजन शहराला त्यामध्ये अधिक क्रीडाप्रकार आयोजित करण्याचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे. मात्र सर्व क्रीडाप्रकार मिळून जास्तीत जास्त १० हजार ५०० खेळाडूंची व ३१० पदकांची मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची काळजी संयोजकांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे २०२०मध्ये टोकियो येथे होणाऱ्या स्पर्धेच्या वेळी बेसबॉल व सॉफ्टबॉल या खेळांचा समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रस्ताव पाठविण्याच्या नवीन पद्धतीला २०२४च्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून सुरुवात केली जाणार आहे. या स्पर्धेच्या संयोजनासाठी अमेरिका बोस्टन, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस व वॉशिंग्टन ही शहरे उत्सुक आहेत.