व्यावसायिक आणि कोलकाता नाइट रायडर्सचे सह- मालक जय मेहता आणि बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सध्या आपल्या मुलीवर भलतेच खूश आहेत. जय आणि जूही यांची १७ वर्षांची मुलगी जान्हवी मेहता इंडियन प्रीमिअर लीगच्या ११ व्या सीझनची सर्वात लहान सदस्य झाली आहे. एवढेच नाही तर केकेआर टीममध्ये कोणत्या खेळाडूला घ्यावे या निर्णयातही तिचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. एका मुलाखतीत जान्हवीचे बाबा जय मेहता यांनी खुलासा केला की, जान्हवीचा सर्वात आवडता खेळ क्रिकेट आहे. केकेआरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बाप-लेकीची एक मुलाखत शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी आपल्या अनुभवाबद्दल बोलताना दिसते.

केकेआरने शेअर केलेल्या या व्हिडिओनुसार जय मेहता म्हणाले की, ‘मला वाटतं की हा जान्हवीसाठी फार चांगला अनुभव होता आणि ती आमच्यासोबत असणं ही आमच्यासाठीही फार चांगली गोष्ट होती. जान्हवी शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असते. पण ती दोन- तीन दिवसांसाठी इथे आली आहे. आम्ही तिला खूप दिवसांनी पाहू शकलो याचं आम्हाला समाधान आहे आणि जान्हवीही यातून खूप काही शिकेल.’

जान्हवीही तिच्या या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाला की, मला एक चांगलं प्रशिक्षण मिळालं आहे. अनुभव कथन करताना तिने केकेआरमध्ये तिला कोणता खेळाडू हवा याबद्दल ही सांगितले. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू क्रिस लिनचे नाव घेताना जान्हवी म्हणाली की, ‘आम्ही त्याला आमच्या टीममध्ये घेऊ शकलो याचा मला आनंद आहे. त्याने खूप सारे षटकार मारले आहेत, त्यामुळे त्याला खेळताना पाहणं फार मनोरंजनात्मक असेल.’