आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला सामना गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला आणखी एक धक्का बसला आहे. हैदराबादविरुद्ध सामन्यात षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्लीकडून पहिल्यांदाच नियमांचा भंग झाल्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचं सामनाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. याआधी तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब सामन्यातही कर्णधार विराट कोहलीला षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी १२ लाखांचा दंड सुनावण्यात आला होता.

दरम्यान, दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादने आपला स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि त्याला वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीची मिळालेली साथ यांच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १६०पार मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राशिद खानच्या फिरकीपुढे दिल्लीला १५ धावांनी हार पत्करावी लागली.