आयपीएलच्या सहाव्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सर्वात अनिश्चित कामगिरीसाठी ओळखला जातो. आयपीएलच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या मुंबई इंडियन्सशी शनिवारी त्यांची गाठ पडत आहे. पण पंजाबचा संघ त्यांचा धक्कादायक पराभव करू शकतो. बाद फेरीचे आव्हान जिवंत राखण्यासाठी त्यांना या विजयाची नितांत आवश्यकता आहे. पण हे आव्हान सोपे मुळीच नाही. वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर सलग आठ सामन्यांमधील विजयांनिशी रोहित शर्माचा मुंबई संघ धरमशालामध्ये साखळीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी आला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसारख्या बलाढय़ संघाला हरविण्याची किमया साधल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचा आत्मविश्वास दुणावला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली पंजाब अखेरच्या टप्प्यात अनपेक्षित पराक्रम दाखवत आहे. गिलख्रिस्टलासुद्धा फलंदाजीचा फॉर्म गवसला आहे. शॉन मार्श आणि डेव्हिड मिलर यांचे विजयांमध्ये चांगले योगदान लाभत आहे.
गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार, संदीप शर्मा, अनुभवी अझर मेहमूद टिच्चून गोलंदाजी करीत आहेत. फिरकी गोलंदाज पीयूष चावला त्यांच्या दिमतीला आहे.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीत आक्रमण आणि संयमाचा योग्य संयोग आहे. दिनेश कार्तिक, कप्तान रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड धावांचा पाऊस पाडत आहेत. दहा लाख डॉलर्सला लिलावामध्ये खरेदी करण्यात आलेला ग्लेन मॅक्सवेल चांगली सलामी संघाला देत आहे. याशिवाय मिचेल जॉन्सन, लसिथ मलिंगा आणि धवल कुलकर्णीवर त्यांच्या वेगवान माऱ्याची धुरा आहे, तर हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा यांच्यावर फिरकीची मदार आहे.
ऑरेंज कॅप
१. ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) ६८०
२. माइक हसी (चेन्नई सुपर किंग्स) ६४०
३. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) ५७८
पर्पल कॅप
१. ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्ज) २४
२. सुनील नरिन (कोलकाता नाइट रायडर्स) २२
३. मिचेल जॉन्सन (मुंबई इंडियन्स) २२
सर्वाधिक षटकार
१. ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) ४७
२. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) २७
३. डेव्हिड मिलर (किंग्ज इलेव्हन पंजाब) २४
सामना : मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
स्थळ : हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम, धरमशाला
वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.