इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. फलंदाजीवरच उभय संघांची भिस्त आहे. पाच सामन्यांतून अवघा एक विजय अशी पंजाबची तर दोन विजय अशी हैदराबादची अवस्था असल्याने विजयाची गाडी रुळावर आणण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.

या दोन संघांना विजयासाठी पूर्णपणे फलंदाजीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच भुवनेश्वर कुमारने दुखापतीमुळे ‘आयपीएल’मधून माघार घेतल्याने हैदराबादच्या गोलंदाजांवरील ताण वाढला आहे. संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल या गोलंदाजांचे अपयश ही हैदराबादची चिंता आहे.  त्यांना टी. नटराजनवर सर्वाधिक अवलंबून राहावे लागत आहे. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि केन विल्यम्सन अशी भक्कम फळी हैदराबादकडे आहे.

पंजाबची सर्वाधिक भिस्त यंदाच्या ‘आयपीएल’ सर्वाधिक धावा करणाऱ्या के. एल. राहुलवर आहे. राहुल प्रत्येक सामन्यात फटकेबाजी करत आहे, मात्र त्यावर पंजाबला विजय मिळवणे अवघड जात आहे. या स्पर्धेत राहुलने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ३०२ धावा केल्या आहेत. त्याच्या जोडीला मयांक अगरवालनेही एक शतक आणि एका अर्धशतकासह २७२ धावा काढल्या आहेत. अखेरच्या षटकांमधील गोलंदाजी ही पंजाबसाठी चिंतेची बाब आहे. राजस्थानविरुद्ध २२२ धावा करूनही पंजाबचे गोलंदाज विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

*  सामन्याची वेळ  : सायं. ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १