Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Score Today, 20 May 2023 : आयपीएल २०२३ चा ६८ वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊच्या फलंदाजांची सुरुवातीला दाणादाण उडाली. क्विंटन डिकॉक आणि प्रेरक मंकडने सावध खेळी करत पॉवर प्ले मध्ये पन्नाशी गाठली. परंतु, त्यानंतर सलग पाच विकेट्स गेल्याने लखनऊच्या धावसंख्येचा वेग मंदावला. त्यानंतर मात्र आयुष बदोनी आणि निकोलस पूरनने आक्रमक फलंदाजी करत दमदार अर्धशतक ठोकलं. त्यामुळे लखनऊला २० षटकात ८ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी १७७ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
लखनऊसाठी सलामीला उतरलेला करन शर्मा स्वस्तात माघारी परतला. शर्मा ३ धावांवर असताना हर्षीत राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डीकॉक आणि प्रेरक मंकडने सावध खेळी करत धावसंख्येचा आलेख वाढवला. परंतु, डीकॉक २८ धावांवर असताना वरुण चक्रवर्तीच्या फिरकीचा शिकार झाला. त्यानंतर प्रेरकही २६ धावांवर वैभव अरोराच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
विशेष म्हणजे लखनऊचा धडाकेबाज फलंदाज मार्कस स्टॉयनिसला या सामन्यात धावांचा सूर गवसला नाही. स्टॉयनिस वैभव अरोराच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. कर्णधार कृणाल पांड्या ९ धावांवर झेलबाद झाला. पण त्यानंतर निकोलस पूरनचा वादळ आला. आयुष बदोनीनं सावध खेळी करून निकोलसला साथ दिली. बदोनीनं २५ तर पूरनने ३० चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीनं ५८ धावांची खेळी साकारली.