Rohit Sharma’s reaction on retirement : रोहित शर्मा हळूहळू आयपीएल २०२४ मध्ये आपली छाप पाडू लागला आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर हिटमॅनने आता पूर्णपणे फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: २ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी तो कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. ३६ वर्षांचा असलेला रोहित शर्मा आता करिअरच्या शेवटच्या टप्प्यातून जात आहे, मात्र सध्या तरी निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. आताही त्याला भारतासाठी मोठ्या स्पर्धा जिंकण्याची भूक आहे. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या प्रसिद्ध टॉक शोमध्ये रोहितने निवृत्तीबद्दलही सांगितले.

हिटमॅनच्या म्हणण्यानुसार तो अजूनही विश्वचषक जिंकण्यासाठी आणि भारतासाठी संभाव्य आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकण्यासाठी प्रेरित आहे. शोमध्ये रोहित म्हणाला, “मी खरोखर निवृत्तीचा विचार केला नाही पण, मला माहित नाही की आयुष्य तुम्हाला कुठे घेऊन जाईल. मी आत्ताही चांगला खेळत आहे त्यामुळे मी आणखी काही वर्षे खेळत राहीन आणि नंतर मला माहीत नाही. मला विश्वचषक जिंकायचा आहे आणि २०२५ मध्ये डब्ल्यूटीसी फायनल आहे, त्यामुळे आशा आहे की भारत त्यात यशस्वी होईल.”

अशी कोणती गोष्ट आहे जिच्यामुळे आपण विश्वचषक गमावला? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, “माझ्या मनात अशी एकही गोष्ट नाही. कारण मला वाटते की आम्ही सर्व बॉक्समध्ये टिक केले होते, आम्ही चांगले क्रिकेट खेळत होतो. आमच्यात आत्मविश्वास होता. आपल्या सर्वांचा एक ना एक दिवस वाईट असतो आणि मला वाटते की तो आमचा वाईट दिवस होता. असे समजू नका की त्या फायनलमध्ये आम्ही खराब क्रिकेट खेळलो, काही गोष्टी आमच्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत, पण ऑस्ट्रेलियाचा संघ आमच्यापेक्षा थोडा सरस होता.”

हेही वाचा – MI vs RCB : विराट कोहलीने अचानक मैदानात आपले दोन्ही कान का पकडले? VIDEO होतोय व्हायरल

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “माझ्यासाठी ५० षटकांचा विश्वचषक हा खरा विश्वचषक आहे. आम्ही तो विश्वचषक पाहत मोठे झालो आहोत. विशेष म्हणजे भारतातल्या आमच्या घरच्या प्रेक्षकांसमोर तो खेळला जात होता. त्या फायनलपर्यंत आम्ही खूप छान खेळलो. जेव्हा आम्ही उपांत्य फेरी जिंकलो, तेव्हा मला वाटले की आम्ही फक्त एक पाऊल दूर आहोत, आम्ही सर्व योग्य गोष्टी करत आहोत.”

हेही वाचा – MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड

रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या फायनलमधील भारताच्या दुःखद पराभवावरही भाष्य केले. जिथे फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. संपूर्ण स्पर्धेत अपराजित असलेला रोहितचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाकडून अंतिम फेरीत हरला आणि १३ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ कायम राहिला.