Jasprit Bumrah Sacrifice for Mohammad Siraj: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. या कसोटीत बुमराह-सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पहिल्याच दिवशी सर्वबाद केलं. सिराजने इंग्लंड दौऱ्यावरील उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. तर जसप्रीत बुमराहने जगातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केली आहे. या दोघांच्या घातक जोडीपुढे विडिंज संघाचे फलंदाज फार काळ टिकले नाहीत. पण यादरम्यान बुमराहने सिराजसाठी जी कृती केली ते पाहून सर्वच जण जस्सीचं कौतुक करत आहेत.

मोहम्मद सिराजने दोन मेडन षटकासह एक विकेट घेत दणक्यात सुरूवात केली. सिराजने पहिल्याच सत्रात ३ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर दुसऱ्या सत्रात त्याने अजून १ विकेट घेतली. सिराजने घरच्या मैदानावर कसोटीत आजपर्यंत कधी पाच विकेट्स घेतल्या नव्हत्या. त्यामुळे या डावात ते शक्य असल्याचं दिसत होतं.

दरम्यान दुसऱ्या डावात बुमराहने आपल्या भेदक यॉर्करवर स्पलेमधील सलग दोन षटकांत २ विकेट्स घेतल्या. बुमराहची भेदक गोलंदाजी आणि विंडिंज संघाचे खालच्या फळीतील गोलंदाज अशी लढत सुरू होती. बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे भले भले फलंदाज माघारी परततात, त्यामुळे बुमराहसमोर शेपटाचे फलंदाज किती काळ टिकणार हा प्रश्न होता.

बुमराहने मोहम्मद सिराजसाठी नेमकं काय केलं?

बुमराहने ४१व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जॉन लेनला क्लीन बोल्ड केलं. यासह टीम इंडियाने ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे संघाला ऑल आऊट करण्यासाठी एका विकेटची गरज होती. तर सिराजला पाच विकेट्स पूर्ण करण्यासाठीही एका विकेटची गरज होती. त्यामुळे सिराजने हे पूर्ण षटक विचित्र पद्धतीने पूर्ण केलं. त्याने ऑफ-स्टंपच्या बाहेर सलग चार चेंडू टाकले. चाहत्यांनी बुमराहच्या गोलंदाजीतील बदल अचूक टिपला, की बुमराह जाणूनबुजून अशी गोलंदाजी करत आहे, कारण दुसऱ्या टोकाने सिराज गोलंदाजी करत होता, जो पाच विकेट घेण्यापासून फक्त एक विकेट दूर होता.

चाहत्यांनी बुमराहच्या या कृतीचं कौतुक केलं, कारण बुमराहने मनात आणलं असतं तर अगदी सहज ४ विकेट्स घेतल्या असत्या. पण बुमराहने केलेल्या त्यागानंतरही सिराज ५ विकेट्स घेण्यात अपयशी ठरला. त्यानंतर सिराजच्या जागी गिलने कुलदीपला गोलंदाजी दिली आणि त्याने ४४व्या षटकात वेस्ट इंडिजला ऑलआऊट केलं.