Jasprit Bumrah Wins Sir Garfield Sobers Trophy: आपल्या एका षटकाच्या जोरावर संपूर्ण सामन्याचा रोख बदलणारा भारताचा गेमचेंजर गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहने कायमच आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तर २०२४ मध्ये बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांनाच अधिकच चकित केले. बुमराहने भारताच्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध दौऱ्यात बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली. यानंतर आता आयसीसीने त्याचा सन्मान केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराहला २०२४ चा सर गार्लफिल्ड सोबर्स सर्वाेत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार आयसीसीने जाहीर केला आहे. या पुरस्कारासाठी बुमराहसह तीन खेळाडूंनी नामांकन मिळालं होतं. हे तिन्ही खेळाडू फलंदाज होते, तर बुमराह त्यांच्यात एकटाच गोलंदाज होता. बुमराहने ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि इंग्लंडचे हॅरी ब्रूक, जो रूट यांना मागे टाकत बुमराह या पुरस्काराचा मानकरी ठरला.

जसप्रीत बुमराहसाठी २०२४ हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले. गेल्या वर्षी त्याने एकही एकदिवसीय सामना खेळला नाही, परंतु तो कसोटी आणि टी-२० मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. टीम इंडियाला १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात त्याने महत्त्वाचे योगदान दिले. या स्पर्धेत त्याने ८ सामन्यांमध्ये केवळ ४.१७ च्या इकॉनॉमीने १५ विकेट घेतले.

दुसरीकडे, जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी कसोटीत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. जसप्रीत बुमराहने २०२४ मध्ये एकूण १३ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने १४.९२ च्या सरासरीने ७१ विकेट घेतल्या. गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला. गेल्या वर्षी मायदेशात इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत संघाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्याने अप्रतिम कामगिरी केली.

जसप्रीत बुमराहला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी २०२४ चा ICC क्रिकेटर ऑफ द इयर तसेच ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाने हे ICC पुरस्कार जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याच वेळी, एका वर्षात २ आयसीसी पुरस्कार जिंकणारा बुमराह जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah wins icc cricketer of the year award 2024 with phenomenal performance across all formats bdg