Indian Team Console South africa women’s team after World Cup Final: भारतीय महिला क्रिकेट संघाने ५२ वर्षांची प्रतीक्षा संपवत अखेरीस महिला विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून इतिहास घडवला. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर भारताने ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.३ षटकांत २४६ धावांवर गारद झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात भारताविरुद्ध कडवी झुंज दिली, परंतु त्यांना विजयाची चव चाखता आली नाही आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याशिवाय, महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात २५ वर्षांनंतर, भारताच्या रूपात जगाला एक नवीन विजेता मिळाला. यापूर्वी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघच स्पर्धेचं जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरले होते.
टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कृतीने फायनलनंतर जिंकलं मन
दक्षिण आफ्रिकेचा संघ महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच पोहोचला होता. कर्णधार लॉरा वुल्वाहार्डच्या नेतृत्त्वाखाली आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाने स्पर्धेत चांगली कामगिरी केली. पण पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचल्याने दक्षिण आफ्रिकेसाठीही ट्रॉफी जिंकणं तितकंच महत्त्वाचं होतं. पण पराभव पदरी पडल्याने संघ निराश झाला.
दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या डोळ्यातही अश्रू होते. पण विश्वचषक जिंकल्याचा जल्लोष करत असतानाही टीम इंडियाच्या खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची भेट घेण्यात विसरल्या नाहीत. जेमिमा रॉड्रीग्ज व राधा यादवने भावुक झालेल्या मारिजन कॅपला मिठी मारत तिचं सांत्वन केलं. तर स्मृती मानधनाने कर्णधार लॉरा वुल्व्हार्डला मिठी मारत तिच्याशी बोलताना दिसली. भारतीय संघाने दाखवलेल्या या खेळभावनेने सर्वांची मनं जिंकली.
